चित्त्यांवरचे सावट सरे ना, कुनोत आणखी एका चित्त्याचा मृत्यू

छायाचित्र प्रातिनिधिक
भोपाळ, दि. १० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशातून नामशेष झालेल्या चित्त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी दक्षिण आफ्रिकेतून मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानात आणलेल्या चित्त्यांवरचे सावट अधिकच गडद होत आहे. आधी ‘साशा’, नंतर ‘उदय’ आणि आता ‘दक्षा’ या चित्त्याच्या मृत्यूने या प्रकल्पावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दक्षिण आफ्रिकेतून मध्यप्रदेशच्या कुनो राष्ट्रीय उद्यानात स्थलांतरित झालेल्या मादी चित्ता ‘दक्षा’चा काल मृत्यू झाला. मुख्य वनसंरक्षक जे.एस.चौहान यांनी याला दुजोरा दिला आहे.
दक्षिण आफ्रिकेतून दक्षाला यावर्षी कुनो येथे आणण्यात आले होते. कुनो नॅशनल पार्कच्या निरीक्षण पथकाला मंगळवारी सकाळी दक्षा जखमी अवस्थेत आढळली होती. तिला उपचारासाठी नेण्यात आले. दुपारी बाराच्या सुमारास तिचा मृत्यू झाला. कुनो नॅशनल पार्कमध्ये गेल्या दीड महिन्यात 3 चित्त्यांचा मृत्यू झाला आहे. आता येथे फक्त 17 चित्ते उरले आहेत. यापूर्वी २७ मार्चला ‘साशा’ ही मादी चित्ता, २३ एप्रिलला ‘उदय’ या नर चित्त्याच्या मृत्यू झाला होता.
चित्त्यांच्या पुनर्वसनासाठी केंद्र सरकार सातत्याने प्रयत्न करत आहे. दरम्यान, सरकारच्या या प्रयत्नांना पुन्हा एकदा झटका बसला आहे. दक्षिण आफ्रिकेतून आणलेल्या ‘दक्षा’ या मादी चित्ताचा मृत्यू झाल्याची पुष्टी वनविभागाने केली आहे. वनविभागाच्या म्हणण्यानुसार, दक्षाचा मृत्यू चित्त्यांच्या आपापसातल्या भांडणातून झाला आहे. वास्तविक दक्षावर दोन नर बिबट्याने हल्ला केला होता. यामध्ये तिचा मृत्यू झाला.
चित्ता प्रकल्पाचे प्रमुख असलेले डॉ. यजुवेंद्रदेव झाला यांनी या प्रकल्पाच्या सुरुवातीलाच यातील धोके सांगितले होते. कुनोचे जंगल २० चित्त्यांकरिता लहान असल्याने काही चित्त्यांना राजस्थानच्या मुकुंद्राच्या जंगलात पाठवण्यास देखील त्यांनी सुचवले होते. मात्र याकडे दुर्लक्ष केल्यामुळे आता हे चित्ते मृत्यूमुखी पडत असल्याची चर्चा देशभरातील वन्यजीवतज्ज्ञामध्ये होत आहे.
SL/KA/SL’
10 May 2023