हे दांपत्य होणार अयोध्येतील कार्यक्रमाचे मुख्य यजमान तर मोदी केवळ प्रतीकात्मक

 हे दांपत्य होणार अयोध्येतील कार्यक्रमाचे मुख्य यजमान तर मोदी केवळ प्रतीकात्मक

अयोध्या, दि. १६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : 22 जानेवारीला अयोध्येत होणाऱ्या श्रीराममूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे.रामभक्त या सोहळ्याबाबत सर्व तपशिल जाणून घेण्यासाठी कमालीचे उत्सुक आहेत. आतापर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे प्राणप्रतिष्ठेचे प्रमुख यजमान असतील अशा बातम्या येत होत्या, मात्र प्राणप्रतिष्ठेसाठी शुभ मुहूर्त ठरवणारे पंडित गणेशवर शास्त्री द्रविड, राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा करणारे पंडित लक्ष्मीकांत दीक्षित आणि महासचिव डॉ. रामानंद पंथाच्या श्रीमठ ट्रस्टचे स्वामी रामविनय दास यांनी दावा केला आहे की पंतप्रधान मोदी मुख्य यजमान नव्हे तर प्रतिकात्मक यजमान असतील.

श्री रामजन्मभूमी ट्रस्टचे सदस्य डॉ. अनिल मिश्रा आणि त्यांच्या पत्नी प्रमुख यजमान असतील. हे दोघेही संकल्प, प्रायश्चित्त आणि गणेशाची पूजा करून 7 दिवस चालणाऱ्या अनुष्ठानाचे यजमान असतील. प्राणप्रतिष्ठा सोहळ्यातही उपस्थित राहतील. त्यांच्या मते, रामलल्ला प्राणप्रतिष्ठा विधीचे मुख्य यजमान केवळ गृहस्थच असू शकतात. त्यामुळेच असा निर्णय घेण्यात आला आहे. पीएम मोदी हे प्रतिकात्मक यजमान मानले जाऊ शकतात.अशी माहिती या प्रमुख व्यक्तींनी केलेल्या दाव्यानंतर समोर येत आहे. प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाचे मुहूर्तकार गणेशवर शास्त्री द्रविड यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष महंत नृत्य गोपाल दास, संघ प्रमुख मोहन भागवत आणि मिश्र दाम्पत्य मुख्य सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. पंतप्रधान मोदी गर्भगृहात हाताने कुशा आणि शलाका ओढतील. त्यानंतर रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा होईल. त्यापूर्वी 16 ते 21 जानेवारी या 6 दिवसीय पूजेत डॉ.मिश्रा दाम्पत्य मुख्य भूमिकेत राहतील. पीएम मोदींचे प्रतिनिधी म्हणून ते ६० तास शास्त्रीय मंत्रपठण ऐकतील, तर ७व्या दिवशी पीएम मोदी उपस्थित राहतील. त्या दिवशी ते नैवेद्य दाखवतील आणि आरतीही करतील.

कोण आहेत डॉ अनिल मिश्रा

अनिल मिश्रा हे आंबेडकर नगर येथील होमिओपॅथ डॉक्टर आहेत. डॉ अनिल मिश्रा हे श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्राचे विश्वस्त आहेत. मूळचे अयोध्येच्या शेजारील आंबेडकर नगर येथील रहिवासी. सध्या ते उत्तर प्रदेश होमिओपॅथिक बोर्डाचे संचालक आहेत. ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अवध प्रांताचे कार्यवाह आहेत. ते व्यवसायाने होमिओपॅथीचे प्रसिद्ध डॉक्टर आहेत. शहरातील रिकबगंज आणि रीडगंजमध्येही स्वत:चा दवाखाना चालवतात. डॉ.अनिल मिश्रा यांच्या कुटुंबात पत्नीशिवाय दोन मुले आणि सूना आहेत. दोन्ही मुलेही व्यवसायाने डॉक्टर आहेत. 1981 मध्ये त्यांनी होमिओपॅथीमध्ये पदवी पूर्ण केली.

SL/KA/SL

16 Jan. 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *