महादेवी हत्तीणीसाठी कोल्हापुरात देशातील पहिले अत्याधुनिक पुनर्वसन केंद्र

कोल्हापूर, दि. १० : कोल्हापुरातील नांदणी येथील महादेवी हत्तीणीला न्यायालयाच्या आदेशानंतर ‘वनतारा’ येथे नेण्यात आले होते. मात्र, आता हा वाद संपुष्टात आला आहे. वनताराकडून कोल्हापूर जिल्ह्यात हत्तींसाठी देशातील पहिले अत्याधुनिक सेटेलाइट पुनर्वसन केंद्र सुरू करण्याचा प्रस्ताव दिला आहे. या प्रस्तावानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी रिलायन्स इंडस्ट्रीजच्या (Reliance Industries) ‘वनतारा’ (Vantara) या प्राणी कल्याण उपक्रमाचे प्रमुख अनंत अंबानी आणि त्यांच्या कुटुंबाचे आभार मानले आहेत.
कोल्हापूरच्या नांदणी परिसरात हे केंद्र स्थापन करण्याची योजना आहे. या केंद्राचा मुख्य उद्देश महादेवी नावाच्या हत्तीणीची काळजी घेणे हा आहे. या केंद्रात आधुनिक आणि वैज्ञानिक सुविधा असतील, ज्याद्वारे महादेवीच्या पुनर्वसनावर आणि तिच्या एकूण कल्याणावर लक्ष केंद्रित केले जाईल.
‘वनतारा’च्या म्हणण्यानुसार, हा निर्णय लोकांच्या भावना, मठाचे नेतृत्व आणि प्राणी कल्याण अशा तीन महत्त्वाच्या गोष्टींचा आदर करतो. महादेवीच्या देखभालीवरून दीर्घकाळापासून वाद सुरू होता, ज्यात प्राणी हक्क संस्था पेटाने तिच्या काळजीवाहकांवर गैरवर्तनाचा आरोप केला होता. मात्र, आता पुनर्वसन केंद्रामुळे या वादावर पडदा पडला आहे.
SL/ML/SL