मराठा आणि धनगर आरक्षण प्रकरणी केंद्र सरकारने सहकार्य करावे

नवी दिल्ली, दि. २ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मराठा आणि धनगर समाजाला आरक्षण देण्यासाठी केंद्र सरकारने महाराष्ट्र राज्य सरकारला सर्वतोपरी सहकार्य करावे, अशी मागणी सर्वपक्षीय बैठकीत शिवसेना लोकसभा गटनेते खासदार राहुल शेवाळे यांनी केली. संसदेच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांनी, केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठक बोलावली होती. या बैठकीला सर्वपक्षीय नेत्यांनी उपस्थिती नोंदवली. आगामी अधिवेशनात होणाऱ्या कामकाजाचा प्राथमिक आढावा या बैठकीत घेतला गेला.
यावेळी बोलताना खासदार शेवाळे यांनी मराठा आरक्षण आणि धनगर आरक्षण या दोन प्रलंबित मागण्यांमुळे महाराष्ट्रात सामाजिक वातावरण गढूळ झाल्याची माहिती केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांना दिली. तसेच, ओबीसी आराक्षणाला धक्का ना लावता मराठा समाजाला आणि एस टी प्रवर्गाला धक्का न लावता धनगर समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारने एकत्रित प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे खासदार शेवाळे यांनी अधोरेखित केले. या आरक्षणाचा प्रश्न सोडविण्यासाठी केंद्र सरकारने राज्य सरकारला सहकार्य करावे, अशी विनंती या बैठकीत त्यांनी केली.
ML/KA/SL
2 Dec. 2023