कृषी विद्यापीठाचा परिसर फुलला विविधरंगी फुलांनी
अकोला, दि. १२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : फुलोंके रंगसे… दिल की कलम से…! साहित्यिक, कवींपासून ते सामान्य नागरिकांना भुरळ घालणारी फुलं, ही निसर्गाची एक सुंदर रचनाच होय. म्हणूनच फुलं ही शुभेच्छा, आशिर्वाद, भक्ती भावनांचे, कोंदण ठरते अकोल्यातील डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाच्या पुष्पशास्त्र आणि प्रांगण विकास विभागाच्या प्रक्षेत्रात शेकडो प्रकारच्या नयन रम्य फुलांनी बहरलेली फुलशेती सध्या सर्वांनाच आकर्षित करीत आहे.
नागपूर मुंबई महामार्गावरून कृषी विद्यापीठात फुललेली शेकडो प्रकारची फुलशेती नागरिकांच्या नजरेत पडत असल्याने विद्यापीठाच्या सौंदर्यात अधिकच भर पडली आहे. पुष्पशात्र आणि प्रांगण विकास विभागाच्या वतीने विद्यापीठाच्या परिसरात 12 वेगवेगळ्या प्रकारच्या फुलांची लागवड करण्यात आली असून यामध्ये गुलाबाचे विविध 50 प्रकार, ग्लॅडीओलसचे 65, शेवंतीचे 155 प्रकार यासह गुलाब, निशिगंध, मोगरा, डेलिया, गॅलार्डिया, झेंडू, हंगामी बिजली यासह अनेक देशी विदेशी फुलांनी येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाची फुलशेती सध्या बहरुन आली आहे.
हा प्रयोग जिल्ह्यात फुलशेती करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी लाभदायक ठरत आहे.20 , 21 फेब्रुवारी रोजी फुलांचे हे प्रदर्शन सर्वांसाठी आयोजित करण्यात आले आहे. कृषी विद्यापीठात पीएचडी करण्यासाठी राज्यसह देशातील विविध भागातील विद्यार्थी आलेले असून पुष्पशास्त्र आणि प्रांगण विकास विभागाच्या विद्यार्थ्यांनी ही फुलशेती साकारण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली असून या माध्यमातून फुलांचे शेकडो प्रकार उदयाला आले आहेत. विद्यापीठात पाण्यातील वॉटर लीली, कमळ सारखी फुले ही आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरत आहेत.
विद्यापीठात सध्या झेंडू मोठया प्रमाणावर बहरला आहे. झेंडूची विविध रंगी, आकारांचे ताटवे ओळीने बहरुन आले आहेत. हे दृष्य नयनरम्य ठरतंय. सोबतच गुलाब, बिजली, एस्टर, निशिगंध असे विविध प्रकारच्या फुल पिकांची लागवड करुन त्यांच्या विविध जाती विकसित करण्याचे काम येथे केले जात आहे. पुष्पगुच्छ,माळा तयार करण्यापासून ते विविध प्रयोजनांना फुल महत्त्वाची ठरतात त्यामूळे केवळ शेतकऱ्यांसाठी पारंपारिक पिकांसह फुल शेतीचा पर्याय शेती उत्पन्न वाढवण्यासाठी महत्त्वाचा ठरेल हे निश्चित.
ML/KA/SL
12 Feb. 2024