‘विस्मरणातील कल्याणकर’ पुस्तक प्रसिद्ध

 ‘विस्मरणातील कल्याणकर’ पुस्तक प्रसिद्ध

कल्याण, दि. १६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आपल्या शहरासाठी आणि समस्त कल्याणकरांसाठी अवघे आयुष्य वेचलेल्या पितरांचे ( शहराच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान दिलेल्या कल्याणकर व्यक्ती) स्मरण आणि त्यांच्या कार्याची नव्या पिढीला ओळख करून देण्यासाठी ‘स्वर्गीय गंगाधरपंत जोशी उत्कृष्ट कार्यकर्ता पुरस्कार समिती’ने ‘विस्मरणातील कल्याणकर’ पुस्तकाची निर्मिती केली आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार, ‘लोकसत्ता’ चे माजी निवासी संपादक सुधीर जोगळेकर यांनी रविवारी केले.

महाराष्ट्र टाइम्स- ठाणे प्लस पुरवणीत ज्येष्ठ पत्रकार शेखर जोशी यांनी लिहिलेल्या ‘विस्मरणातील कल्याणकर’ या लेखमालिकेच्या पुस्तकाचे प्रकाशन जोगळेकर यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. हे पुस्तक विनामूल्य वितरित केले जाणार आहे. याच कार्यक्रमात स्वर्गीय गंगाधरपंत जोशी उत्कृष्ट कार्यकर्ता पुरस्कार समितीकडून देण्यात येणारा यावर्षीचा ‘उत्कष्ट कार्यकर्ता’ पुरस्कार रघुनंदन दाबके यांना जोगळेकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. रोख अकरा हजार रुपये, स्मृतीचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

सुभेदार वाडा गणेशोत्सव मंडळाच्या सभामंडपात झालेल्या या कार्यक्रमास सुभेदार वाडा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे संचालक ॲड. सुरेश पटवर्धन, भालचंद्र जोशी, मयुरेश आगलावे, मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती श्रीराम मोडक, ‘विस्मरणातील कल्याणकर’ पुस्तकाचे लेखक, ज्येष्ठ पत्रकार शेखर जोशी, सार्वजनिक गणेशोत्सव सुभेदार वाडा मंडळाचे या वर्षीचे अध्यक्ष प्रवीण शिंपी, राम जोशी उपस्थित होते.

दोन दिवसांनी गणेशोत्सवाची सांगता होईल आणि भाद्रपद पौर्णिमेपासून पितृ पंधरवड्याची सुरुवात होईल. पितरांचे स्मरण करणारा पक्ष हे या पंधरवड्याचे वैशिष्ट्य. पितृपक्षाच्या पूर्व संध्येला हे पुस्तक प्रसिद्ध होत असून हे एका अर्थाने समस्त कल्याणकरांच्या वतीने केलेले पितृस्मरण असल्याचे सांगून जोगळेकर म्हणाले, वृत्तपत्रीय साहित्य ही उद्याची रद्दी असते असे म्हणतात. त्यामुळे विस्मरणातील कल्याणकरांवरची लेखमाला विस्मरणात जाण्याआधी ती पुस्तक रुपाने वाचकांसमोर आणण्याचे महत्वाचे आणि इतिहास स्मरणाचे काम स्वर्गीय गंगाधरपंत जोशी उत्कृष्ट कार्यकर्ता पुरस्कार समितीने केले आहे.

कल्याणच्या सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, औद्योगिक विश्वात गेल्या चाळीस-पन्नास वर्षात भरीव योगदान देणारी ही सर्व मंडळी आहेत. त्यांचे स्मरण आणि त्यांचे कार्य नव्या पिढीतील कल्याणकरांपुढे ठेवणे सर्वतोपरी आवश्यक होते. राम जोशी आणि सुरेश पटवर्धन यांनी हे महत्वाचे काम केले असून यासाठी ते ही अभिनंदनास पात्र आहेत. कल्याण शहराची ओळख जपणारी ठिकाणे विकासाच्या धबडग्यात हरवली जाण्याची दाट शक्यता आहे. अशा विस्मरणात जाणाऱ्या कल्याणच्या ओळखीच्या ठिकाणांवरही शेखर जोशी यांनी लिहावे, अशी सूचनाही जोगळेकर यांनी केली.

आज संपूर्ण जग छत्रपती शिवाजी महाराजांच्या युद्धकौशल्याचा विद्यापीठीय स्तरावरून अभ्यास करत आहे. या युद्धनीतीचा अविभाज्य भाग असलेल्या आरमाराच्या निर्मितीचे स्मारक आता जवळपास ४०० वर्षांनंतर सुमारे २५ एकर जागेवर कल्याणच्या खाडीकिनारी उभे राहते आहे. त्याकाळी हे आरमार उभारताना शिवाजी महाराजांनी सरखेल, सरनौबत या पदांवर काम करणारी मंडळी कदाचित कल्याणबाहेरून नेमली असतील, पण सामान्य बांधकाम कारागीर तर कल्याण आणि परिसरातीलच असतील. ते कोण, त्यांचे वंशज कोण, त्यातल्या कुणी ही कला जपली आहे का, त्यांच्यापैकी कुणाकडे काही कागदपत्रं, संबंधित हत्यारे आहेत का, निदान त्यांची वंशावळ कुणी जतन केली आहे का हे शोधण्याची गरज आहे, असेही जोगळेकर यांनी सांगितले.

‘देव मस्तकी धरावा, अवघा हलकल्लोळ करावा’, असे समर्थ रामदास स्वामी म्हणायचे. यात थोडा बदल करून ‘ गाव मस्तकी धरावा, अवघा इतिहास अभ्यासावा, योग्य तोच मांडावा, भविष्याकारणे’, असे म्हटले पाहिजे, असे जोगळेकर म्हणाले‌. यावेळी शेखर जोशी, सुरेश पटवर्धन, राम जोशी, रघुनंदन दाबके यांनीही मनोगत व्यक्त केले.

ML/ML/SL

16 Sept 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *