कोकणातील समुद्र किनाऱ्यांचे रुपडे पालटणार

 कोकणातील समुद्र किनाऱ्यांचे रुपडे पालटणार

मुंबई दि ३:– कोकण ग्रामीण पर्यटन विकास कार्यक्रमांतर्गत कोकण विभागाच्या पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी राज्य शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. राज्यमंत्री योगेश कदम यांच्या संकल्पनेतून कोकणातील सर्व समुद्र किनाऱ्यांचा आंतरराष्ट्रीय दर्ज्याचा विकास करण्यासाठी तसेच सुसज्ज, स्वच्छ आणि अत्याधुनिक पर्यटनाच्या सोयी सुविधा असलेले समुद्र किनारे विकसित करण्यात येणार आहेत. यासाठी प्रथम प्राधान्याने दापोली तालुक्यातील कर्दे समुद्रकिनाऱ्याच्या सुशोभीकरणासाठी ₹14 कोटी निधी ग्रामविकास राज्य मंत्री योगेश कदम यांनी मंजूर केला आहे.

या निर्णयामुळे कोकणातील पर्यटनास नवी दिशा मिळणार असून कोकणाच्या पर्यटन विकासासाठी महत्त्वपूर्ण पावले उचलण्यात आलेली आहेत. कोकणातील समुद्रकिनाऱ्यांचा साखळी पद्धतीने विकास करण्याच्या दृष्टीने हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.

या योजनेअंतर्गत कर्दे समुद्रकिनाऱ्यावर विविध मूलभूत आणि पर्यटनविषयक सोयी सुविधा उभारण्यात येणार आहेत. या विकास कामांमध्ये विशेषतः बचत गटाच्या महिलांसाठी रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होणार असून यात दुकाने आणि फेरीवाले झोन बांधण्यात येणार आहेत.

समुद्रकिनाऱ्या लगत कोकणातील स्थानिक लोककला, उत्सव तसेच साहसी जलक्रीडा यांना वाव देण्यासाठी संस्कृतीक संकुल उभारण्यात येणार आहे. तसेच आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटक माहिती केंद्र उभारण्यात येणार आहे. समुद्र किनारे स्वच्छ तसेच सुशोभित ठेवण्यासाठी स्वयंचलित फूड कंपोस्टर आणि प्लास्टिक श्रेडींग मशीन पुरवले जाणार आहे.

यामुळे स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी मिळतील आणि कोकणातील पर्यटन व्यवसायाला चालना मिळेल. तसेच, स्वच्छता तथा सुरक्षिततेसाठी या ठिकाणी विशेष उपाययोजना केल्या जाणार आहेत. भविष्यात कोकणातील इतर किनाऱ्यांवरही अशा स्वरूपाच्या विकास योजना राबविण्याचा राज्यमंत्री योगेश कदम यांचा मानस आहे.

या योजनेच्या निविदा प्रक्रिया लवकरच राबविण्यात येणार असून, प्रशासकीय सोपस्कार पार पडल्यानंतर प्रत्यक्ष कामांना सुरुवात होणार असल्याची माहिती राज्य मंत्री कदम यांच्या कार्यालयाने दिली आहे. हे प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर कर्दे समुद्रकिनाऱ्याला एक नवा पर्यटनात्मक चेहरा मिळेल आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला मोठा फायदा होईल. पर्यटनाच्या माध्यमातून स्थानिक संस्कृती, खाद्यसंस्कृती आणि पारंपरिक व्यवसायांना प्रोत्साहन देण्यासाठीही शासन विशेष प्रयत्न करणार आहे. या उपक्रमामुळे कोकणातील पर्यटनक्षेत्र अधिक सक्षम आणि आकर्षक होईल, असे प्रतिपादन राज्यमंत्री योगेश कदम यांनी केले आहे.

ML/ML/SL

3 April 2025

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *