पान विडीच्या दुकानावर महापालिकेकडून होत असलेली कारवाई त्वरीत थांबवावी
मुंबई दि.11(एम एमसी न्यूज नेटवर्क) : मुंबई शहरात अधिकृत व परंपरागत व्यवसाय असलेल्या पान विडीच्या दुकानात पोलीस प्रशासन व महापालिकेकडून होत असलेली अन्यायकारक कारवाई त्वरीत थांबवावी अन्यथा प्रखर आंदोलन करण्यात येईल असा इशारा मुंबई विडी तंबाखू व्यापारी संघाने आज दिला आहे. मुंबई मराठी पत्रकार संघ येथे याबाबत प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधला. मुंबई शहर व उपनगरात जवळपास १५० वर्षाहून अधिक काळ सुमारे अडीच लाख व्यावसायिकांची पान, तंबाखूजन्य वस्तुंसह खाद्यवस्तू विक्रीचे दुकाने आहेत.
या पिढीजात व्यवसायात जवळपास १० लाख कुटुंबाचा चरितार्थ चालत आहे. सुशिक्षित, बेरोजगार, नोकरी न मिळालेले अथवा नोकरी गमावलेले, निराधार/विधवा महिला आपल्या लहान-मोठया जागेत अल्प भांडवलात व्यवसाय करुन आपल्या मुलांचे व कुटुंबाचे पोषण, आरोग्य, शिक्षण, मंगलकार्य इत्यादी अनेक बाबींची पूर्तता याच व्यावसायातून मिळणाऱ्या उत्पन्नातून करत आहेत. मात्र पोलिस प्रशासन आणि महापालिका यांच्याकडून वारंवार दुकानातील वस्तू जबरदस्तीने उचलून नेणे, व्यावसायिकाला, व्यापाऱ्याला दमबाजी करणे अशा प्रकारे कारवाईच्या नावाखाली त्रास देणे सुरु असते. या बाबी त्वरीत थांबवण्यात याव्यात असे याद्वारे आज आम्ही शासनास विनंती करीत असल्याचेही संघाचे अध्यक्ष शशांक राव यांनी स्पष्ट केले.
या संदर्भात सर्व आस्थापना व संघटना चांची बैठक सरकारने त्वरीत आयोजित करून यामध्ये समन्वय साधावा अन्यथा मुंबईसह राज्यभरातील सर्व पान बिडी विक्रेते शासनाच्या चा अन्यायकारक कारवाई विरुध्द आझाद मैदान येथे धरणे आंदोलन करतील असा इशारा या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून देण्यात आला. या पत्रकार परिषदेकरिता शशांक राव, प्रकाश अडविलकर, नंदकुमार हेगिष्टे, संजय गांगण, सुभाष साबळे, हर्षद शेट्ये, संजय कोळवणकर, सचिन संसारे, सदेश शेरे, अशोक तेलंग, राजेंद्रकुमार बल्लाळ, प्रभाकर शेट्ये, विजय बिजम, महेन्द्र रेडिज, अविनाथ पाथरे, सुनिल डोळस, समीर नारकर, गोपीनाथ नारकर, रुपेश कोलते इत्यादींसह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
ML/ML/SL
11 July 2024