ठाण्यात रंगणार ६२वी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा २८ नोव्हेंबरपासून
ठाणे, दि. २३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ठाण्यातील डॉ काशिनाथ घाणेकर मिनी नाट्यगृह येथे ६२ वी हौशी राज्य नाट्य स्पर्धा प्राथमिक फेरी सुरू होत आहे. २८ नोव्हेंबर ते ४ जानेवारी दरम्यान या स्पर्धा होणार आहेत. ठाण्यातील ज्येष्ठ रंगकर्मी, साहित्यिक, मान्यवर कलाकार ह्यांच्या उपस्थितीत स्पर्धेचा उद्घाटन सोहळा पार पडेल.
आई एकविरा सांस्कृतिक कलामंच, भेंडखळ या संस्थेच्या “पैशाने तुटली नाती” या नाटकाने स्पर्धेचा शुभारंभ होईल. सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार व सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य नाट्य स्पर्धा पार पडणार असल्याचे सांस्कृतिक कार्य संचालक बिभीषण चवरे यांनी नमूद केले आहे.
या स्पर्धेमध्ये एकूण पंचवीस संघांचा सहभाग असणार आहे. ठाणे जिल्ह्यासह रायगड आणि पालघर जिल्ह्याचे संघही या स्पर्धेत सहभागी होऊन आपले प्रयोग सादर करतील. राज्य नाट्य स्पर्धेतील सर्व नाटकांना जास्तीत जास्त प्रेक्षकांनी उपस्थित राहावे हे आवाहन सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे. ठाणे केंद्राचे स्पर्धा समन्वयक म्हणून रंगकर्मी प्रफुल्ल गायकवाड काम पाहत आहेत.
संपर्क –
ठाणे केंद्र समन्वयक – प्रफुल्ल गायकवाड
9004912468
सादर होणारी नाटकं –
पैशाने तुटली नाती (आई एकविरा सांस्कृतिक कलामंच, भेंडखळ), बॅलन्सशीट (अॅमॅच्युअर थिएटर, नागोठणे), साहेब (अनंत सांस्कृतिक आणि सामाजिक कलामंच,अलिबाग), काक्षी (चांगु काना ठाकूर आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालय {स्वायत्त}, पनवेल), बांडगुळ (अस्तित्व संस्था, ठाणे), कुणी तरी येणार येणार ग (दख्खनचा राजा प्रतिष्ठान), झेलम (ज्ञानदीप कलामंच ठाणे), कपट्टयम (फ्रेंड्स सामाजिक कलामंच भेंडखळ), लोक काय म्हणतील (गंधार कला संस्था), लोक काय म्हणतील (जिद्दी मराठा सामाजिक प्रतिष्ठान, भाईंदर), बारस (मराठा समाज सेवा संस्था, ठाणे), जिंदगी वन्स मोर (मुक्तछंद नाट्यसंस्था), #अविघ्नेया (ओमकार गणेशोत्सव मंडळ), नाथ हा माझा (पनवेल तालुका अखिल भंडारी सेवा मंडळ), आधे अधुरे (रामदास शेवाळे प्रतिष्ठान), फेंट (रंगमित्र सांस्कृतिक कला मंडळ, इंदापूर) ऑफकोर्स (रंगसेवा सांस्कृतिक मंडळ, अलिबाग), मित्राची गोष्ट (सक्षम एज्युकेशन सोसायटी), बोलका पथ्थर (श्री लक्ष्मीकांत सार्वजनिक वाचनालय आणि ग्रंथ संग्रहालय), ‘द रेन इन द डार्क’ (स.न.वि.वि.प्रतिष्ठान), त्याची गोष्ट (स्पंदन नाट्य कला क्रीडा व शैक्षणिक मंडळ), केस नंबर अमुक तमुक (सुहासिनी नाट्यधारा, महाड, रायगड), विठाईच्या काठी (स्वा.वि.दा.सावरकर प्रतिष्ठान, विष्णुनगर,ठाणे {प}), देव चालले… चालले (विश्वरंगभूमी सामाजिक संस्था), कालपुरुष (योगायोग कला सेवा संस्था).
ML/KA/SL
23 Nov. 2023