लवकरच सुरु होणार प्रो कबड्डी लीगचा 12वा हंगाम

नवी दिल्ली, दि. ९ : देशातील लोकप्रिय लीगपैकी एक असलेल्या प्रो कबड्डी लीग (PKL) चा 12वा हंगाम येत्या 29 ऑगस्टपासून रंगणार आहे. PKL चे आयोजक मशाल स्पोर्ट्स यांनी आज ही अधिकृत घोषणा केली. प्रो कबड्डी लीग सीझन 12 चे थेट प्रसारण स्टार स्पोर्ट्स नेटवर्क वर आणि जिओ सिनेमा (JioCinema) वर पाहता येणार आहे. लीगशी संबंधित सर्व अपडेट्स www.prokabaddi.com या संकेतस्थळावर पाहता येतील.
31 मे आणि 1 जून रोजी मुंबईत पार पडलेल्या खेळाडूंच्या लिलावात, दहा खेळाडूंना 1 कोटींहून अधिक रकमेची बोली मिळाली. जे लीगच्या इतिहासात एक मोठं पाऊल मानलं जात आहे. यामुळे हंगामात सामना अधिक तगडा आणि थरारक होणार, याबाबत शंका नाही. पीकेएलचे लीग कमिश्नर अनुपम गोस्वामी यांनी सांगितले, “सीझन 12 ची सुरुवात जाहीर करताना आम्हाला खूप आनंद होतो आहे. यंदाच्या लिलावाने सगळे विक्रम मोडलेत. त्यामुळे हंगाम अधिक स्पर्धात्मक होणार आहे. चाहत्यांना बड्डी अॅक्शनचा जबरदस्त अनुभव देण्यासाठी आम्ही उत्साहित आहोत.”
सध्या फक्त सुरुवातीची तारीख जाहीर करण्यात आली असून, मॅचेस कुठे होतील यासंबंधीची माहिती लवकरच देण्यात येणार आहे. दरम्यान, सर्व 12 संघांनी आपली रचना मजबूत केली असून प्रत्येक संघ विजेतेपदासाठी झुंज देण्यास सिद्ध आहे.
अॅमेच्युअर कबड्डी फेडरेशन ऑफ इंडिया (AKFI) यांच्या मार्गदर्शनाखाली मशाल स्पोर्ट्स आणि जिओस्टार यांनी मिळून पीकेएलला भारतातील सर्वात लोकप्रिय आणि यशस्वी लीग्समध्ये स्थान मिळवून दिलं आहे. भारतीय पारंपरिक खेळ कबड्डीला जागतिक व्यासपीठावर नेण्याचं श्रेय मोठ्या प्रमाणात या लीगला जातं. या मंचावरून अनेक नवोदित खेळाडूंना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकता आलं आहे.
SL/ML/SL