नागपूरमध्ये सुरु होणार राष्ट्रीय न्यायवैद्यक विज्ञान विद्यापीठाचे १० वे कॅम्पस

नवी दिल्ली, दि. १९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर येथे आता राष्ट्रीय न्यायवैद्यक विज्ञान विद्यापीठाचे १० वे कॅम्पस उभारण्यात येणार आहे. अशी घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमीत शहा यांनी केली आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी X या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट लिहून केंद्र सरकारचे आभार मानले आहे. फडणवीस यांनी लिहिले आहे की, ” माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली, महाराष्ट्र शिक्षण आणि तांत्रिक प्रगतीमध्ये उल्लेखनीय टप्पे गाठत आहे. नागपूर येथे राष्ट्रीय न्यायवैद्यक विज्ञान विद्यापीठ कॅम्पसची घोषणा केल्याबद्दल माननीय पंतप्रधान आणि केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमितभाई शहा यांचे खूप खूप आभार. महाराष्ट्राने आधीच न्यायवैद्यक विज्ञान उपक्रमांमध्ये आघाडी घेतली आहे आणि हे विद्यापीठ कॅम्पस निःसंशयपणे तपास विज्ञान वाढवेल, मानवी संसाधने सुधारेल आणि आपल्या देशाच्या न्यायवैद्यक क्षमता बळकट करेल.
नागपूरमध्ये राष्ट्रीय न्यायवैद्यक विज्ञान विद्यापीठाचे १० वे कॅम्पस सुरू होणार आहे, यामुळे भारतातील उच्च शिक्षणाचे केंद्र म्हणून नागपूरचा दर्जा आणखी मजबूत होईल, एनएफएसयूच्या समावेशामुळे शहराच्या शैक्षणिक क्षेत्रात भर पडणार आहे. पुण्यानंतर हे महाराष्ट्रातील दुसरे एनएफएसयू कॅम्पस असणार आहे. दरम्यान, महाराष्ट्र सरकारने या प्रकल्पासाठी जमीन मंजूर केली होती. यंदा जूनमध्ये तात्पुरत्या ठिकाणी वर्ग सुरू होण्याची शक्यता आहे. त्यासाठी नागपूर विद्यापीठाने विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेजवळील जागा देऊ केली आहे. एनएफएसयू ही फॉरेन्सिक शिक्षणासाठी जागतिक स्तरावर नावलौकीक असलेली संस्था आहे.
केंद्रीय गृहमंत्रालयाने मंजूर केलेले तिन्ही विद्यापीठ राष्ट्रीय न्यायवैद्यक विज्ञान विद्यापीठ कायदा, २०२० नुसार स्थापन केले जातील. केंद्र सरकारच्या या निर्णयासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ओडिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण माझी तसेच छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णु देव साय यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे आभार मानले आहेत.
SL/ML/SL
19 March 2025