ठाणे जिल्हा परिषद ४०२ शासकीय सेवा देणार घरपोच

ठाणे, दि. ११ : ठाणे जिल्ह्यातील नागरिकांसाठी एक अत्यंत उपयुक्त आणि जनहितकारी उपक्रम सुरू करण्यात आला आहे. ठाणे जिल्हा परिषदेकडून ‘डोअर स्टेप डिलिव्हरी’ म्हणजेच घरपोच सेवा सुरू करण्यात आली असून, याअंतर्गत आता नागरिकांना जन्म, मृत्यू, विवाह नोंदणीसह एकूण ४०२ शासकीय सेवा घरबसल्या मिळणार आहेत. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी या उपक्रमाची माहिती दिली.
या उपक्रमाअंतर्गत ८० विभागांची सेवा ४३१ ग्रामपंचायतींमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे. नागरिकांना त्यांच्या घरीच सेवा मिळवता यावी, यासाठी आपले सरकार सेवा केंद्र मधील प्रतिनिधी संबंधित व्यक्तीच्या घरी जाऊन आवश्यक कागदपत्रांची स्कॅनिंग करतात व ऑनलाइन प्रक्रिया पूर्ण करतात. सेवा मंजूर झाल्यानंतर संबंधित प्रमाणपत्र किंवा दस्तऐवज थेट घरपोच दिला जातो.
या उपक्रमाचा लाभ आतापर्यंत हजारो नागरिकांनी घेतला असून, शासनाच्या सेवांचा लाभ घेण्यासाठी आता कार्यालयात धावपळ करण्याची गरज उरलेली नाही. या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. “नागरिकांना त्यांच्या दारात सेवा देणे हेच खऱ्या अर्थाने चांगल्या प्रशासनाचे लक्षण आहे,” असे रोहन घुगे यांनी सांगितले.
सेवा मिळवण्यासाठी http://thanedoorstep.in या संकेतस्थळावर भेट देऊन किंवा ८३८०८२२३३३ या क्रमांकावर संपर्क साधून अपॉइंटमेंट बुक करता येते.
हा उपक्रम म्हणजे डिजिटल भारताच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे, जो प्रशासन आणि नागरिक यांच्यातील अंतर कमी करत आहे.