माजिवडा-लोढा भागातील वाहतुकीचा ताण कमी होणार!
ठाणे, दि २६
आ. केळकर यांच्या पाठपुराव्यामुळे नवीन पुलाचे काम लवकरच..
माजिवडा-लोढा भागातील नाल्यावरील सुमारे २५ वर्षे जुना पुल जीर्ण झाला असून येथील वाढत्या लोकसंख्येनुसार आमदार संजय केळकर यांनी केलेली नवीन पुलाची मागणी मान्य करण्यात आली आहे. लवकरच नवीन पुलाच्या कामास सुरुवात होणार असल्याने परिसरातील वाहतुकीचा ताण मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे.
बुधवारी आमदार संजय केळकर यांनी अधिकाऱ्यांसोबत स्थळपहाणी केली. यावेळी एमएमआरडीएचे अभियंता नितीन कांबळे आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता आनंदा नाडविडेकर उपस्थित होते.
जयभवानी नगरपासून बाळकुम गावाला जोडणारा पूल अवघा आठ मीटर रुंद असून सुमारे २५ वर्षे जुना आहे. या परिसरात मोठमोठी गृहसंकुले उभी राहिली असून वाढत्या लोकसंख्येला ही वाहतूक व्यवस्था तोकडी होती. याबाबत आमदार संजय केळकर यांनी ठाणे महापालिकेसह संबंधित विभागांकडे पाठपुरावा सुरू केला होता. या प्रयत्नांना यश आले असून जुन्या पुलाला पर्यायी रस्ता म्हणून लोढा पॅराडाइज ते जुना बाळकुम असा २० मीटर रुंद नवीन पूल उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मागील तीन वर्षांपासून स्थानिक पदाधिकारी सचिन शिनगारे यांनी याबाबत आमदार संजय केळकर यांच्याकडे पाठपुरावा केला होता. नवीन पुलामुळे या भागातील अंतर्गत वाहतुकीवरचा ताण कमी होणार असून परिसर कोंडीमुक्त होणार आहे.
स्थळ पाहणी करताना परिवहन सदस्य विकास पाटील, मंडल अध्यक्ष नीलेश पाटील, पिटर डिसूजा, माजी नगरसेवक लॉरेंस डिसूझा, तृप्ती सुर्वे, अनुराधा रोडे, मेघनाथ घरत, सचिन शिनगारे, योगेश टिकम, प्रकाश राव, आदी भाजप पदाधिकारी आणि स्थानिक नागरिकही उपस्थित होते.AG/ML/MS