ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील करदात्यांसाठी मोठा दिलासा
ठाणे, दि ११– ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील करदात्यांसाठी मोठा दिलासा देणारा निर्णय घेण्यात आला आहे. निवासी मालमत्ता करावरील शास्ती म्हणजेच दंड आणि व्याजामध्ये तब्बल 90 टक्के सूट देण्याची योजना जाहीर करण्यात आली आहे.
ही माहिती ठाणेच्या महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी गटनेते पवन कदम तसेच महापालिकेचे उपायुक्त जी. जी. गोदेपुरे उपस्थित होते.
महापौरांनी सांगितले की, अनेक करदात्यांनी निवासी मालमत्ता करावरील दंडामध्ये सवलत देण्याची मागणी केली होती. त्यानुसार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्याशी चर्चा करून करदात्यांना दिलासा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या योजनेअंतर्गत ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील निवासी करदाते जर थकीत मालमत्ता कर आणि चालू वर्षाचा कर भरताना शास्तीपैकी फक्त 10 टक्के रक्कम जमा करतील, तर उर्वरित 90 टक्के दंड माफ करण्यात येणार आहे.
ही योजना 12 मार्च 2026 ते 25 मार्च 2026 या कालावधीत लागू असणार आहे.
करदात्यांना महापालिकेच्या सर्व संकलन केंद्रांवर तसेच अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाइन पद्धतीने कर भरता येणार आहे. तसेच Google Pay, PhonePe, Paytm आणि BHIM अॅपद्वारेही कर भरण्याची सुविधा उपलब्ध आहे. याशिवाय व्हॉट्सअॅप चॅटबॉटच्या माध्यमातूनही कराची माहिती मिळू शकते.
ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील करदात्यांनी या संधीचा लाभ घेत थकीत मालमत्ता कर भरावा, असे आवाहन महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी केले आहे.AG/ML/MS