Tesla ने सुरू केली ‘राइट-हँड ड्राईव्ह’ Cars ची निर्मिती

मुंबई, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : टेस्ला ही जगातील अग्रगण्य इलेक्ट्रिक कार्स बनवणारी कंपनी आहे. इलॉन मस्कच्या मालकीची Tesla कंपनी भारतीय मार्केटमध्ये येण्यासाठी गेल्या कित्येक वर्षांपासून प्रयत्न करत आहे. ही कंपनी आता भारतात लाँच होण्यासाठी सज्ज झाली आहे. अमेरिका आणि इतर बऱ्याच देशांमध्ये डाव्या बाजूला स्टिअरिंग व्हील असणाऱ्या गाड्या वापरल्या जातात. मात्र, भारतात उजव्या बाजूला स्टिअरिंग असणाऱ्या गाड्या वापरल्या जातात. यामुळे टेस्ला आता राईट-हँड-ड्राईव्ह असणाऱ्या खास गाड्या तयार करत आहे.टेस्लाच्या बर्लिनमधील फॅक्टरीत या गाड्यांचं (Tesla RHD Cars) उत्पादन घेतलं जात आहे. हिंदुस्तान टाईम्सने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. यासोबतच भारतातील मॅन्युफॅक्चरिंग प्लांटची निर्मिती देखील वेगाने सुरू असल्याचं या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. गुजरात, तामिळनाडू किंवा महाराष्ट्र या तीन राज्यांपैकी एका ठिकाणी टेस्ला आपला प्लांट उभारू शकते.
भारत सरकारने मागच्या महिन्यातच नवीन ईव्ही पॉलिसी आणली होती. यामुळे विदेशातील इलेक्ट्रिक वाहन निर्मात्या कंपन्यांसाठी देशात मॅन्युफॅक्चरिंग प्लांट उभारण्याची संधी उपलब्ध झाली आहे. यासाठी कंपन्यांना कमीत कमी 500 मिलियन डॉलर्सची गुंतवणूक करण्याची अट लागू करण्यात आली आहे. सोबतच, या कंपन्यांना कमीत कमी तीन वर्षे भारतात आपला प्लांट सुरू ठेवावा लागणार आहे. यासोबतच, या गाड्यांमध्ये वापरण्यात येणारे 25 टक्के पार्ट्स भारतातून खरेदी करणं अनिवार्य असणार आहे.
दरम्यान चिनी इलेक्ट्रिक कार निर्माती कंपनी BYD आणि श्याओमी देखील भारतात येण्याच्या तयारीत आहेत. शिवाय भारतातील सुझूकी, महिंद्रा आणि टाटा या कंपन्या देखील इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये नवनवीन मॉडेल्स लाँच करत आहेत. त्यामुळे भारतात इलेक्ट्रिक कार मार्केटमध्ये मोठी स्पर्धा पहायला मिळणार आहे.
SL/ML/SL
5 April 2024