रशियाच्या राजधानीत आयसीसचा दहशदवादी हल्ला, १३३ जणांचा मृत्यू

 रशियाच्या राजधानीत आयसीसचा दहशदवादी हल्ला, १३३ जणांचा मृत्यू

मॉस्को, दि. २३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : रशियाची राजधानी मॉस्कोमधील क्रोकस कॉन्सर्ट हॉलमध्ये झालेल्या गोळीबारात १३३ जणांचा मृत्यू झाला असून १४५ जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये लहान मुलांचाही समावेश आहे. दहशतवादी संघटना आयसिसनं या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. आमच्या हल्लेखोरांनी मॉस्कोच्या वेशीवरील क्रोकस कॉन्सर्ट हॉलमध्ये हल्ला केला, अशी माहिती आयसिसनं त्यांच्या टेलिग्राम चॅनलच्या माध्यमातून दिली आहे. आमचे हल्लेखोर सुरक्षितपणे माघारी परतले, असंही आयसिसनं म्हटलं आहे.

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मॉस्को येथे झालेल्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांना आदरांजली अर्पण केली. मोदींनी म्हटलं आहे की, “मॉस्कोमधील दहशतवादी हल्ल्याचा मी तीव्र निषेध करतो. आमच्या प्रार्थना पीडितांच्या कुटुंबीयांसोबत आहेत. या दु:खाच्या वेळी भारत रशियन सरकार आणि तेथील लोकांसोबत उभा आहे.”

दहशतवादी हल्ल्यावेळी क्रॉकस सिटी हॉलमध्ये सोव्हिएत काळातील प्रसिद्ध म्युझिक बँड ‘पिकनिक’कडून सादरीकरण सुरू होतं. या कॉन्सर्टला ६२०० जण हजर होते. दहशतवादी हल्ल्याचा तपास सुरू असल्याची माहिती रशियन अधिकाऱ्यांनी दिली. राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याकडून सातत्यानं घडामोडींचा आढावा घेतला जात आहे. आंतरराष्ट्रीय समुदायानं या निर्घृण हल्ल्याचा निषेध करावा, असं आवाहन रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयानं केलं आहे.

रशियन माध्यमांनी दहशतवाद्यांचे फोटो जारी केले आहेत. हल्लेखोरांची चेहरेपट्टी आशियाई आणि कॉकेशियाई लोकांसारखी होती, अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. हल्लेखोर रशियन भाषेत बोलत नव्हते. परकीय भाषेतून त्यांचा संवाद सुरू होता, असा दावा प्रत्यक्षदर्शींनी केला. दहशतवादी इन्गुशेतियाचे मूळ रहिवासी असल्याचा रशियन माध्यमांचा दावा आहे. सैनिकांच्या गणवेशात आलेल्या दहशतवाद्यांनी इमारतीत प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी अंदाधुंद गोळीबार सुरू केला. समोर येणाऱ्या प्रत्येकावर त्यांनी गोळ्या झाडल्या. यानंतर त्यांनी स्फोट घडवला. त्यामुळे कॉन्सर्ट हॉलला आग लागली.

SL/ML/SL

23 March 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *