जालन्यात दहावीच्या मराठी विषयाचा पेपर फुटला, जिल्हाधिकाऱ्यांचा इन्कार

जालना दि २१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : दहावीच्या परीक्षा आजपासून सुरू झाल्या आहेत. परीक्षेदरम्यान जालना, यवतमाळमध्ये पेपरफुटीच्या घटना घडल्या आहेत. शुक्रवारी २१ फेब्रुवारीला जालन्यातील बदनापूर येथील केंद्रानजीक असलेल्या एका झेरॉक्स सेंटरवर थेट उत्तरपत्रिकांच्या झेरॉक्स मारून विद्यार्थ्यांना पुरवल्या गेला. जालन्यात दहावीच्या मराठी विषयाचा पेपर फुटल्याची माहिती समोर आली असून दहावीच्या पहिल्याच पेपरला कॉपी मुक्त अभियानाचा फज्जा उडाल्याचे पाहायला मिळत आहे.
बदनापूर येथील एका परीक्षा केंद्रावर मराठी विषयाचा पेपर फुटला आहे. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये मोठा गोंधळ उडाला. या प्रकरणी आता शिक्षण विभाग काय कारवाई करते याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिलं आहे. दुसरीकडे जिल्हाधिकाऱ्यांनी पेपर फुटल्याचा इन्कार केला आहे.
आज काही वृत्त वाहिन्यानी ‘जालना जिल्ह्यातील बदनापूर शहरात दहावीचा मराठी विषयाचा पेपर फुटला’ या आशयाचे चूकीचे वृत्त प्रसारित केले आहे. प्रत्यक्षात असा कोणताही प्रकार घडलेला नसून, स्थानिक झेरॉक्स दूकानदारांनी आजच्या मराठी विषयाच्या प्रश्न पत्रिकेत न आलेल्या प्रश्नांची झेरॉक्स काढून विक्री केली आहे असे जिल्हाधिकारी डॉ श्रीकृष्ण पांचाळ यांनी म्हटले आहे.
प्रश्न पत्रिका परिक्षा केंद्राच्या बाहेर आलेली नाही. जिपचे शिक्षणाधिकारी (माध्यमिक), तहसिलदार आणि पोलिस निरिक्षक यांच्या मार्फत तपासणी करण्यात आली आहे. तथापी याठिकाणी दगडफेक झाली. याबाबत दोषीं व्यक्तीचा शोध घेवून कायदेशीर कार्यवाही सुरु असल्याची माहिती दिली असल्याचे जिल्हाधिकारी यांनी कळविले आहे.
दरम्यान जालना जिल्ह्यातील बदनापूर या या परीक्षा केंद्रावर गैरप्रकार झालेला आहे आणि ती बातमी खरी आहे की खोटी यासाठी तात्काळ संबंधित जिल्ह्याच्या शिक्षणाधिकाऱ्यांशी संपर्क केला आणि अहवाल मागवला आहे आणि ते शिक्षण अधिकारी सदरील अहवाल पाठवत आहेत. अहवाल आल्यानंतर जे कोणी या प्रकरणात दोषी असतील त्यांच्यावर बोर्डाच्या नियमालीनुसार कारवाई केली जाईल असे बोर्डाच्या सचिवांनी स्पष्ट केले आहे.