जनधन योजनेतील साडेदहा कोटी खातेदारांना पुन्हा करावी लागेल KYC
नवी दिल्ली, दि. १६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नरेंद्र मोदी सरकारनं आपल्या पहिल्या कार्यकाळात पंतप्रधान जनधन योजना (PMJDY) सुरू केली होती. या योजनेअंतर्गत आतापर्यंत ५३ कोटींहून अधिक ग्राहकांची बँक खाती उघडण्यात आली आहेत. मात्र, यातील साडेदहा कोटी खातेदारांना आता पुन्हा केवायसी करावी लागणार आहे. वित्तीय सेवा सचिव एम. नागराजू यांनी बँकांना या संदर्भात सूचना दिल्या आहेत. त्यानुसार, ऑगस्ट २०१४ ते डिसेंबर २०१४ या कालावधीत उघडण्यात आलेल्या सुमारे साडेदहा कोटी जनधन खात्यांसाठी नवीन केवायसी प्रक्रिया अवलंबण्यात येणार आहे. आता १० वर्षांनंतर पुन्हा केवायसी करावी लागणार आहे.
ग्राहकांची गैरसोय टाळण्यासाठी बँकांनी केवायसी प्रक्रिया पुन्हा पूर्ण करावी, असं आवाहन नागराजू यांनी केलं. मुदतीत पुन्हा केवायसी पूर्ण करण्यासाठी आवश्यक तिथं अतिरिक्त कर्मचारी तैनात करण्याचे निर्देश त्यांनी बँकांना दिले आहेत.
केंद्र सरकारच्या माहितीनुसार, जनधन खात्याच्या माध्यमातून ५३ कोटी लोकांना औपचारिक बँकिंग प्रवाहात आणण्यात यश आलं आहे. या बँक खात्यांमध्ये २.३ लाख कोटी रुपये जमा करण्यात आलं असून ३६ कोटींहून अधिक मोफत रुपे कार्ड देण्यात आले आहेत. यात दोन लाख रुपयांचं अपघात विमा संरक्षणही आहे. हे खातं उघडण्यासाठी कोणतंही शुल्क किंवा मेंटेनन्स चार्ज आकारला जात नाही आणि खात्यात मिनिमम बॅलन्स ठेवण्याची गरज नाही. याशिवाय खातेदारांना आपत्कालीन परिस्थितीत १० हजार रुपयांपर्यंत ओव्हरड्राफ्टची सुविधा देण्यात आली आहे.