तेजस ठाकरेंनी लावला सापसुरळीच्या ५ नवीन प्रजातींचा शोध

 तेजस ठाकरेंनी लावला सापसुरळीच्या ५ नवीन प्रजातींचा शोध

मुंबई, दि. २० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्राच्या राजकारणात ठाकरे हे नाव प्रसिद्ध असले तरिही या घराण्यातील व्यक्तींनी कलेची आणि निसर्गाची आवडही जोपासली आहे. ठाकरेच्या चौथ्या पिढीचे प्रतिनिधी आदित्य ठाकरे हे वडिल उद्धव ठाकरे यांच्या खांद्याला खांदा लावून राजकारणात वाटचाल करत आहेत. तर आदित्य यांचे धाकटे भाऊ तेजस ठाकरे हे वन्यजीवन आणि किटकाविषयीच्या संशोधनात मग्न असतात. नुकताच तेजस यांनी त्याचे सहसंशोधक ईशान अगरवाल आणि अक्षय खांडेकर यांच्या सह
भारतीय द्वीपकल्पामधून पिल्लाला जन्म देणार्‍या सापसुरळीच्या नव्या कुळाचा आणि ५ नवीन प्रजातींचा शोध लावला आहे. हे संशोधन त्यांनी ‘ठाकरे वाईल्डलाईफ फाउंडेशन’च्या माध्यमातून केले आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, पिल्लाला जन्म देणार्‍या सापसुरळीची ही भारतीय द्वीपकल्पामधील पहिलीच नोंद आहे. जर्मनीमधून प्रकाशीत होणार्‍या ‘व्हर्टिब्रेट्स झूलॉजी’ या अंतरराष्ट्रीय वैज्ञानिक नियतकालिकातून या संशोधनावरती शिक्कामोर्तब झाले.

भारतामधे सापसुरळ्यांच्या चाळीसहून अधिक प्रजातींची नोंद आहे. यातील भारतीय द्वीपकल्पासाठी पिल्लाला जन्म देणार्‍या सापसुरळीची ही पहीलीच नोंद आहे. सरीसृपांमधे पिल्लांना जन्म देण्याचे समयोजन हे कमी तापमानाच्या अधिवासाशी जोडलेले आहे. कमी तापमानामधे अंडी उबवण्याच्या अडचणींवरील उपाय म्हणून थेट पिल्लांनाच जन्म देण्याचे समयोजन उत्क्रांत झाले असावे असा मतप्रवाह आहे.नव्याने शोधलेल्या कुळाला ‘द्रविडोसेप्स’ असे नाव देण्यात आले आहे. ‘द्रविड’ या संस्कृत आणि ‘सेप्स’ या ग्रीक शब्दांवरुन हे नामकरण केले आहे. दक्षिण भारतातील आढळक्षेत्रासाठी ‘द्रविड’ आणि सापसदृश्य ठेवणीसाठी ‘सेप्स’ यांच्या जोडणीतून कुळाचे नाव योजिले आहे. अंड्यांऐवजी पिल्लांना जन्म देणे, डोळ्यांवरील खालच्या पापणीचे पारदर्शक असणे आणि जनुकीय संच्याच्या वेगळेपणावरुन द्रविडोसेप्स हे कुळ सबडोल्युसेप्स या कुळापासून वेगळे केले आहे. नव्याने शोधलेल्या पाचही प्रजाती या तामिळनाडू राज्यातील आहेत.

द्रविडोसेप्स जिंजीएन्सीस, द्रविडोसेप्स जवाधूएन्सीस, द्रविडोसेप्स कलक्कडएन्सीस, द्रविडोसेप्स श्रीविल्लीपुथुरेन्सीस आणि द्रविडोसेप्स तामिळनाडूएन्सीस या पाचही प्रजातींचे नामकरण त्यांच्या आढळक्षेत्रावरुन देण्यात आले. नव्या कुळात समाविष्ट केलेली द्रविडोसेप्स गोवाएन्सीस ही प्रजात उत्तर गोव्यातील उत्सुम तसेच महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग (अंबोली) आणि कोल्हापूर जिल्ह्यातून नोंदवली गेली आहे. कोल्हापूर जिल्हातील तिचा आढळ राधानगरी, पंडिवरे (भुदरगड), तळये (गगनबावडा) आणि वाशी (पन्हाळा) या ठिकाणांवरुन नोंदवला गेला.

SL/KA/SL

20 Jan. 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *