शिक्षक उतरले आंदोलनात पण शाळांना सुट्टी नाही

मुंबई, दि. ८ : राज्यातील विनाअनुदानित आणि अंशतः अनुदानित शाळेतील शिक्षकांनी तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आज आणि उद्या म्हणजेच आठ आणि नऊ जुलै 2025 रोजी राज्यव्यापी शाळा बंद आंदोलनाची हाक दिली आहे. राज्यातील हजारो शिक्षकांनी आणि कर्मचाऱ्यांनी अनुदान आणि आपल्या इतर प्रलंबित मागण्यांसाठी आज आणि उद्या मुंबईतील आझाद मैदानावर राज्यव्यापी आंदोलन करण्याची मोठी घोषणा केली आहे. मात्र असे असले तरीही शाळांना सुट्टी असणार नसल्याचे शासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व शाळा बंद राहतील याचे पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी असे आवाहन सुद्धा संबंधित संघटनांकडून केले जात होते. पण अशातच राज्य शासनाच्या शिक्षण विभागाकडून या संदर्भात एक नवीन आदेश जारी करण्यात आला आहे.
आज आणि उद्या नियोजित सुट्टी नसतानाही शिक्षक आणि कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे शाळांना सुट्टी राहील अशी शक्यता होती. पण राज्य शासनाच्या शिक्षण विभागाकडून काल एक महत्त्वाचा शासन आदेश निर्गमित करण्यात आला. या शासन आदेशान्वये विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित लक्षात घेता आज आणि उद्या शाळा सुरूच राहणार आहेत, असे स्पष्ट करण्यात आले आहे. राज्यातील कोणतीच शाळा आंदोलनामुळे बंद ठेवली जाणार नाही असे या आदेशातून स्पष्ट होते.
SL/ML/SL