राज्यातील शिक्षक भरती आता परीक्षा परिषदेकडे
मुंबई, दि. ३१ : राज्यातील शिक्षक पदभरतीची प्रक्रिया महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदकडून केली जाणार आहे. शिक्षण आयुक्त कार्यालयाद्वारे पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक भरती प्रक्रिया होत होती. राज्य सरकारने आता सुकाणू समितीची स्थापना करत कामकाज परिषदेकडे सोपविण्याचा निर्णय घेतला. राज्यातील शिक्षक भरतीची प्रक्रिया २०१७ पासून पवित्र पोर्टलद्वारे राबविली जाते. शिक्षण आयुक्त कार्यालयाच्या नियंत्रणात प्रक्रियेचे कामकाज होते. परंतु, आता सरकारने ही जबाबदारी परिषदेवर सोपविण्याचा निर्णय मंगळवारी (३० डिसेंबर) घेतला.
शिक्षक पदभरतीशी संबंधित परीक्षेचे आयोजन व निवड प्रक्रिया एकाच संस्थेकडे असणे आवश्यक असल्याचे सांगत सरकारने परिषदेकडे पदभरतीशी संबंधित सर्व कामकाज सोपविण्यात येत असल्याचे जाहीर केले. त्यासह कामकाजाचे कार्यालयनिहाय वाटप त्याअनुषंगाने जबाबदारी निश्चितीसाठी सुकाणू समिती स्थापन करण्यात आली आहे.