TCS करणार 12 हजार कर्मचाऱ्यांची कपात

मुंबई, दि. २९ : भारतातील सर्वात मोठी IT कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) ने आपल्या कर्मचाऱ्यांची संख्या सुमारे 2 टक्क्यांनी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजेच 12 हजार लोकांची नोकरी जाणार आहे. TCS मधील नोकरीला आत्तापर्यंत खूप सुरक्षित मानली जात होती प्रोजेक्ट नसले तरी TCS आपल्या कर्मचाऱ्यांना ‘बेंच’वर ठेवून विविध प्रशिक्षण देऊन दुसऱ्या प्रकल्पांवर कामाला लावत असे. 2020 मध्ये कोरोनामुळे लाखो लोकांची नोकरी गेली होती. परंतु TCS मधील कोणाच्याही नोकरीवर परिणाम झाला नव्हता. त्यामुळे यंदाची ही कामगार कपात अधिक गंभीर मानली जात आहे.
विविध अहवालांनुसार आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) या तंत्रज्ञानाच्या वाढत्या वापरामुळे टेक्नॉलॉजी क्षेत्रातील अनेक नोकऱ्या धोक्यात आल्या आहेत. जरी TCS चे CEO के. कृतिवासन यांनी AI मुळे कपात होत असल्याच्या गोष्टी नाकारल्या असल्या, तरी त्यांनी हे मान्य केलं की AI मुळे प्रोडक्टिविटी 20 टक्क्यांनी वाढली आहे. कपातीसाठी त्यांनी ‘स्किल्सची कमतरता’ कारणीभूत असल्याचं सांगितलं. कृतिवासन यांनी काहीही कारण सांगितलं असले तरी हे चित्र भारताच्या अर्थव्यवस्थेसाठी निश्चितच चिंताजनक आहे.
भारतामधील बेरोजगारी हेही एक मोठं संकट आहे. काही दिवसांपूर्वी रायटर्सने एक रिपोर्ट प्रसिद्ध केला होता ज्यात भारत सरकार बेरोजगारीचे चुकीचे आकडे दाखवत असल्याचा आरोप होता. सरकारने जून महिन्यात बेरोजगारी दर 5.6 टक्के असल्याचं सांगितलं होता. परंतु रायटर्सच्या मते ही आकडेवारी प्रत्यक्षापेक्षा फक्त अर्धीच आहे. सरकारने मात्र या आरोपांना फेटाळून लावलं आणि तो विश्लेषण डेटा आधारित नसल्याचं सांगितलं.
SL/ML/SL