प्रवासी इलेक्ट्रिक वाहनांना या मार्गांवर कर सवलत

मुंबई, दि. २७ :
महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरण २०२५ अंतर्गत मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे, समृद्धी महामार्ग आणि शिवडी-न्हावाशेवा अटलसेतूवर प्रवासी इलेक्ट्रिक वाहनांना टोलमाफी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या संदर्भातील शासन निर्णय नुकताच जारी करण्यात आला आहे.
महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरणांतर्गत स्वच्छ गतिशीलता संक्रमण मॉडेल राबवले जाईल. याअंतर्गत २०३० पर्यंत राज्यातील वाहतूक क्षेत्रातून होणारे कार्बन तसेच प्रदूषणकारी वायू तसेच हरित गृह वायू उत्सर्जन रोखण्याचे उद्दिष्ट आहे. राज्यात विक्री व नोंदणी झालेल्या सर्व इलेक्ट्रिक वाहनांना मोटार वाहन करातून तसेच नोंदणी प्रमाणपत्राच्या किंवा नूतनीकरण शुल्कातून माफी दिली जाईल. इलेक्ट्रिक वाहनांचा स्वीकार होण्यासाठी राज्यात चार्जिंग विषयक पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. राज्य व राष्ट्रीय महामार्गावर प्रत्येक २५ कि.मी. अंतरावर या वाहनांसाठी चार्जिंग सुविधा देखील असतील. सर्व विद्यमान आणि नवीन पेट्रोल पंपांवर किमान एक ईव्ही चार्जिंग सुविधा दिली जाईल.