Tata Group उतरणार हेलिकॉप्टर निर्मिती उद्योगात

 Tata Group उतरणार हेलिकॉप्टर निर्मिती उद्योगात

मुंबई, दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशातील अग्रगण्य कंपनी टाटा समूह आता हेलिकॉप्टर उत्पादन क्षेत्रात पदार्पण करत आहे. यासाठी हेलिकॉप्टर नि्र्माण करणारी कंपनी एअरबस (Airbus) सोबत करार केला आहे. विमान आणि ‘मेक इन इंडियाला’ चालना देण्यासाठी टाटा समूहाने हा करार केला आहे. फ्रान्सची जेट निर्माती कंपनी एअरबस टाटा समूहासोबत देशातील हेलिकॉप्टरसाठी अंतिम असेंब्ली लाइन सेट करण्यासाठी भागीदारी करत असल्याचं एअरबस हेलिकॉप्टर्सने जाहीर केलं आहे. हा करार देशात सिंगल इंजिन हेलिकॉप्टर आणि इतर विमानांच्या निर्मितीसाठी आहे. भारतात हेलिकॉप्टर निर्मिती सुविधा उभारण्यात खासगी क्षेत्राने पुढाकार घेतल्याचं हे पहिलं उदाहरण आहे. आत्मनिर्भर भारताच्या दिशेने हे एक मोठं पाऊल आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त परराष्ट्र सचिव विनय क्वात्रा यांनी या कराराची घोषणा केली आहे.

टाटा कंपनी आता एअरबस कंपनीसोबत मिळून हेलिकॉप्टर्स निर्मिती करणार आहे. FAL भारतासाठी त्यांच्या नागरी श्रेणीतून एअरबसचे सर्वाधिक विकले जाणारे H125 हेलिकॉप्टर तयार करेल. त्यामुळे आता एअरबस हेलिकॉप्टर्स मेड इन इंडिया असतील. इतकंच नाही तर टाटा हे हेलिकॉप्टर्स शेजारील देशांमध्ये निर्यातदेखील करेल.एअरबस आणि टाटा समूहाने संयुक्तपणे युरोपियन विमान निर्माती कंपनी एअरबसच्या H125 सिंगल-इंजिन हेलिकॉप्टरची निर्मिती करण्यासाठी करार केला आहे. गुजरातच्या वडोदरा येथे व्यावसायिक वापरासाठी फायनल असेंब्ली लाइन (FAL) सेट करण्यासाठी करारावर स्वाक्षरी केली आहे. या करारांतर्गत, गुजरातमधील वडोदरा येथे अंतिम असेंब्ली लाइन तयार केली जाईल, जिथे टाटा समूह आणि एअरबस संयुक्तपणे एअरबसचे H125 सिंगल इंजिन हेलिकॉप्टर तयार करतील.

36 एकरांवर पसरलेला FAL (Final Assembly Line) 2024 च्या मध्यापर्यंत तयार होईल आणि नोव्हेंबर 2024 पर्यंत काम सुरू होईल. FAL हैदराबादमध्ये एअरबसच्या मेन कॉन्स्टिट्यूएंट असेंब्ली (MCA) लाईनवर उत्पादित केलेले भाग वापरेल आणि अंतिम असेंब्लीसाठी वडोदरा येथे पाठवले जातील. या कराराअंतर्गत 40 C-295 वाहतूक विमानेही तयार करण्यात येतील, याची देखरेख TASL (Tata Advanced Systems Ltd.) करेल.ही भारतातील खाजगी क्षेत्रातील पहिली हेलिकॉप्टर असेंब्ली सुविधा असेल. टाटा सन्सचे चेअरमन एन चंद्रशेखरन यांनी याबद्दल सांगितलं की, या सुविधेमध्ये जगातील सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या एअरबस H125 सिंगल इंजिन हेलिकॉप्टरची अंतिम असेंब्ली लाइन असेल. एअरबसच्या सहकार्याने या सुविधेमध्ये निर्मित H125 सिंगल इंजिन हेलिकॉप्टर भारतात वापरले जातील आणि त्यांची निर्यातही केली जाईल.

SL/KA/SL

27 Jan. 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *