तन्वीर नाट्यधर्मी पुरस्कार या रंगकर्मीला जाहीर

पुणे, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ‘थिएटर ऑन व्हील्स’ या संकल्पनेतून भारतभर भ्रमण करून एकल नाटके सादर करणारे रंगकर्मी लकी गुप्ता यांना या वर्षीचा तन्वीर नाट्यधर्मी पुरस्कार जाहीर झाला आहे. ज्येष्ठ रंगकर्मी डॉ. श्रीराम लागू यांनी स्थापन केलेले रूपवेध प्रतिष्ठान आणि महाराष्ट्र कल्चरल सेंटरच्या वतीने दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो.
संगीत नाटक अकादमी पुरस्कार विजेते ज्येष्ठ नाटककार राजीव नाईक यांच्या हस्ते १६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजता लकी गुप्ता यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. टिळक रोडवरील ज्योत्स्ना भोळे सभागृहात हा पुरस्कार वितरण समारंभ होणार आहे. या कार्यक्रमात महाराष्ट्र कल्चरल सेंटर आणि लागू कुटुंबीय यांच्या पुढाकाराने नव्याने उभारण्यात येत असलेल्या श्रीराम लागू रंग अवकाशाबद्दल आणि भारतीय रंगभूमीविषयी राजीव नाईक यांचे भाषण होणार आहे.
लकी गुप्ता यांनी थिएटर ऑन व्हील्स’ द्वारे देशभर आठशेहून अधिक ठिकाणी विविध एकल नाटके सादर केली आहेत. त्यांनी केलेल्या नाटकांची प्रयोगसंख्या काही हजारांच्या घरात आहे. ‘माँ, मुझे टागोर बना दे’ या नाटकाचा १३०२ वा प्रयोग त्यांनी नुकताच भोपाळ येथे सादर केला.
SL/KA/SL
5 Nov. 2023