ताडोबा -अंधारी व्याघ्र प्रकल्पात नव्या पर्यटन हंगामाची सुरुवात….

चंद्रपूर दि १ : जगप्रसिद्ध ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या नव्या पर्यटन हंगामाला आजपासून सुरुवात झाली. हवाहवासा गारवा, धुक्याचा शालू पांघरलेली हिरवाई, प्रकल्प व्यवस्थापनाचे आदरातिथ्य आणि ओसंडून वाहणारा पर्यटकांचा उत्साह यामुळे हंगाम वाघमय राहील असा अंदाज आहे.
चंद्रपूरच्या जगप्रसिद्ध ताडोबा -अंधारी व्याघ्र प्रकल्पात नव्या पर्यटन हंगामाची आजपासून उत्साही सुरुवात झाली. विधीवत पूजन करून पर्यटकांना व्याघ्र प्रकल्पात प्रवेश देण्यात आला. गेले तीन महिने पावसाळ्यामुळे व्याघ्र प्रकल्पातील कोअर भाग पर्यटनासाठी बंद होता. पहिल्याच दिवशी देशभरातील व्याघ्रप्रेमी आणि वन्यजीव अभ्यासक ताडोबात दाखल झाले. पावसाळ्यात बाह्य भागात पर्यटन सुरू होते. मात्र पर्यटकांचा ओढा कोअर भागाकडे असल्याने ते याची प्रतिक्षा करत होते. यंदा पहिल्या काही दिवसांत अति पावसामुळे रस्ते खराब आणि काही भागात पाणी असल्याने काही भाग पर्यटनासाठी बंद ठेवण्यात आले.
जगभर ताडोबा- अंधारी व्याघ्र प्रकल्पातील वन्यजीव वैविध्याची पर्यटकांना भुरळ आहे. ताडोबातील पर्यटन हंगाम सुरू झाल्याने अर्थचक्राला गती येण्याची आशा इथल्या व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे.
ताडोबा कधीही निराश करत नाही. अगदी पहिल्याच दिवशी हरणांचे कळप, रानडुकरांचा मोठा समूह, सांबर-भेकर- चितळ- गवे आणि चक्क बिबट्या देखील पर्यटकांना दर्शन देऊन गेला. पहिला दिवस आणि वने आणि वन्यजीवांची श्रीमंती यामुळे पर्यटक आनंदून गेले. आता पुढील वर्षाच्या 30 जून पर्यंत आपल्याला देखील वाघोबा दर्शनासाठी ताडोबा खुणावत आहे. केवळ वाघच नव्हे तर संपन्न निसर्ग आणि वन्यजीव वैविध्य अनुभवण्यासाठी आपणही करा ताडोबाचे नियोजन……ML/ML/MS