ताडोबातील वाघाचे दर्शन महागणार, आंदोलनाचा इशारा

चंद्रपूर दि २६ : वाघांचे नंदनवन समजल्या जाणाऱ्या जाणाऱ्या ताडोबा व्याघ्र प्रकल्पात आता वाघ बघणे महाग झाले आहे. त्यामुळे आता कागदावर वाघ बघण्याची वेळ पर्यटकांवर येण्याची पाळी ओढवते की काय, अशी स्थिती निर्माण झाली आहे. ताडोबाच्या कोअर आणि बफर क्षेत्रात वाघ बघण्यासाठीच्या सफारीचे शुल्क भरमसाठ वाढवण्यात आले आहे. या सफारीसाठी आता प्रत्येक पर्यटकाला एकूण एक हजार रुपये जास्तीचे मोजावे लागणार आहेत. प्रवेश शुल्कात प्रत्येकी 600 रुपये, गाईड शुल्कात 100 रुपये आणि वाहन शुल्कात 300 रुपये प्रतिपर्यटक अशी वाढ करण्यात आली आहे.
हे नवे वाढीव दर येत्या 1 ऑक्टोबरपासून लागू होणार आहेत. या दरवाढीमुळे प्राणी प्रेमींमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात पट्टेदार वाघ सहज दिसत असल्याने तो देश विदेशातील वन्यप्रेमी तसेच पर्यटकांना नेहमी आकर्षित करतो. पण नव्या वाढीमुळे काय परिणाम होतो, हे एक ऑक्टोबरपासून दिसेलच. मात्र या वाढीच्या विरोधात आता खासदार प्रतिभा धानोरकर यांनी आंदोलनाची भूमिका जाहीर केली आहे.
ज्या दिवशी ताडोबा सुरू होणार, म्हणजेच एक ऑक्टोबर रोजी त्या प्रत्येक प्रवेशद्वारावर आंदोलन करणार आहेत. हे वाढीव दर पर्यटकांना अजिबात परवडणारे नसून सर्वसामान्य पर्यटक यामुळे वाघ केवळ चित्रात बघतील, असे त्यांचे म्हणणे आहे. ही वाढ मागे घेण्यासाठी त्यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. याला किती यश मिळेल, हे नंतर कळेलच, मात्र या दरवाढीने पर्यटकांमध्ये नाराजी आहे, एवढे मात्र नक्की.
दरम्यान, याविषयी ताडोबाचे संचालक डॉ प्रभुनाथ शुक्ल यांना विचारले असता त्यांनी गरजेनुसार वेळोवेळी सफारी शुल्क वाढवण्यात येत असून, यापूर्वी देखील वाढ करण्यात आली होती आणि ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या संकेत स्थळावर त्याची रीतसर नोंद देखील करण्यात आली आहे, असे सांगितले.ML/ML/MS