राज्यात सर्वत्र तुफानी पाऊस, पूरस्थितीसाठी यंत्रणा सज्ज

मुंबई, दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गेल्या २४ तासांपासून मुंबई, पुण्यासह राज्यात सर्वत्रच पावसाने अक्षरशः थैमान घातले आहे. राज्यात बहुतांश ठिकाणी पावसामुळे धरणे पूर्ण भरल्यामुळे अतिरिक्त पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. त्यामुळे या अतिरिक्त पाण्यामुळे नदीकाठच्या रहिवाशांना मोठा फटका बसला आहे. पुण्यामध्ये खडकवासला धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरु असल्यामुळे मुळा-मुठा नदी काठच्या घरांमध्ये आणि दुकानांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी घसुन मोठे नुकसान झाले आहे. पुण्यामध्ये संपूर्ण सरकारी सुसज्ज असून जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्या मार्गदर्शनाखाली नागरिकांना सुरक्षीत स्थळी हरवण्यात येत आहे. NDRF टिम देखील जोमाने काम करत असून पूरात अडकलेल्या नागरिकांना वाचवण्याचे काम करत आहे.

मुंबई नजिकच्या अंबरनाथ- बदलापूर शहरांमध्येही अतिरिक्त पाऊस झाल्यामुळे येथून वाहणाऱ्या उल्हास आणि वालधुनी या नद्यांनी रौद्र रूप धारण केले आहे. या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे कल्याण- कर्जत मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. बदलापूरमध्ये देखील NDRF च्या टिम दाखल झाल्या आहेत.
मुंबई, पुणे, रायगड परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी सुरू आहे, मात्र जिल्हा, मनपा प्रशासन सज्ज असून हे संबंधित अधिकारी आणि कर्मचारी हे फिल्डवर आहेत, ज्या ज्या ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती आहे तिथले बचाव कार्य वेगाने सुरु आहे. काळजीचं कारण नाही, मात्र नागरिकांनी देखील आवश्यकता असल्यास घराच्या बाहेर पडावं असं आवाहन मी करतो असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. एनडीआरएफ, एसडीआरएफच्या तुकड्या, लष्कर, नौदल, पोलीस, अग्निशमन दल, आरोग्य यंत्रणा या सर्वांना एकमेकात समन्वय ठेवून आवश्यकतेप्रमाणे मदत करण्याचे निर्देश देण्यात आल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.
रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील कोलाड परिसरातील रात्री जोरदार पावसाने थैमान घातल्याने कुंडलीका नदीने तसेच महिसदरा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळें अचानक गोवे गावात तर आंबेवाडी समर्थ नगर संभे येथील गौरी नगर मध्ये घराघरात शिरले. उडदवणे मार्गावर पाणी आले असून पालदाड पुल वाहतुकीस बंद करण्यात आला आहे.

धाटाव एम आय डी सी कंपनीत पहिल्या पाळीला जाणणारे कामगार माघारी परतले आहेत. या ठिकाणी मोठी पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. सतत कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे अधिक पाणी वाढण्याची शक्यता निर्माण झाली असून नदी काठावरील गावांना भोंगा वाजवून प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. रोहा कोलाड मार्गावर पाले खुर्द नजीक मार्गावर देखील पाणी आल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे.
रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यात रात्री पासून तुफान पाऊस पडतोय या पडणाऱ्या पावसाने सावित्री आणि गांधारी नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून या नदीने रौद्र रूप धारण केलेलं पाहायला मिळत आहे. शहरातील सुकट गल्लीत पाणी शिरले तर दुसरीकडे महाड कडून किल्ले रायगड कडे जाणाऱ्या दस्तुरी नाका या मार्गावर पाणी आल्याने या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्यामुळे धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. राधानगरी धरण 100 टक्के भरले असून आज सकाळी 10.05 वाजता धरणाचा 6 क्रमांकाचा स्वयंचलित दरवाजा उघडला आहे. पावसाचा जोर राहिला तर धरणाचे अन्य स्वयंचलित दरवाजे कोणत्याही क्षणी उघडण्याची शक्यता आहे.
त्यामुळे धरणातून 2928 क्युसेक्स इतका विसर्ग भोगावती नदी पात्रात होत आहे. नदी काठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

कोयना आणि वारणा धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे त्याचबरोबर सांगली जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे त्यामुळे कृष्णा आणि वारणा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. सांगली जिल्ह्यातील एकीकडे पश्चिम भागात नदीकाठ पूरस्थिती निर्माण झाली आहे तर दुसरीकडे पूर्व भागात पाण्याची आवश्यकता आहे, त्यामुळे म्हैसाळ योजनेतील पाणी सोडावे अशी शेतकऱ्यांची मागणी होती. कृष्णा नदीतून वाहून जाणारे पाणी वाया जाऊ नये यासाठी पाटबंधारे विभागाने आज म्हैसाळ योजनेचे दोन पंप सुरू केले आहेत.

बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्राला पाणीपुरवठा करणा-या ७ तलावांपैकी विहार व मोडक सागर हे दोन्ही तलाव आज भरुन ओसंडून वाहू लागले आहेत. यापैकी विहार तलाव हा आज २५ जुलै मध्यरात्री ३ वाजून ५० मिनिटांनी; तर मोडक सागर तलाव आज सकाळी १० वाजून ४० मिनिटांनी ओसंडून वाहू लागला आहे, अशी माहिती बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जलअभियंता खात्याद्वारे देण्यात आली आहे.

विविध ठिकाणी शाळा-महाविद्यालयांना उद्या सुट्टी
राज्यातील पावसाच्या पार्श्वभूमीवर सावधगिरीचा इशारा म्हणून अनेक जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालयांना उद्या २६ जुलै, शुक्रवारी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या पावसाच्या पाश्वभूमीवर ठाणे जिल्ह्यातील शाळांना सुट्टी असून पहिली ते १२वी पर्यंत सर्व माध्यमातील शाळा बंद राहणार आहेत. त्याशिवाय कल्याण – डोंबिवली महापालिका हद्दीतील सर्व शाळांना २६ जुलै रोजी पावसाळी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्याला अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे रत्नागिरी आणि रायगड जिल्हा प्रशासनाकडून उद्या २६ जुलै रोजी शुक्रवारी शाळांना सुट्टी जाहीर केली आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील शाळांना दोन दिवस सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. २६ आणि २७ जुलै रोजी जिल्ह्यातील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी असणार आहे. पुढील दोन दिवस जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट असल्याने जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
पुण्यात मुसळधार पाऊस सुरू असून जिल्ह्यातील अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर शाळांना २६ जुलै शुक्रवारी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. त्याशिवाय लोणावळ्यातही पावसाचा जोर कायम असून खबरदारी तसंच सुरक्षिततेच्या दृष्टीने लोणावळ्यातील १२वी पर्यंत शाळा, महाविद्यालयं २५ तसंच २६ जुलै रोजी बंद राहणार आहेत.
25 July 2024
SL/ML/SL