स्वारगेट बसस्थानकात शिवशाही बसमध्ये तरूणीवर बलात्कार, आरोपी फरार, अशी घडली घटना

मुंबई, दि. 26 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :पुण्यातील स्वारगेट बसस्थानकावर शिवशाही बसमध्ये 26 वर्षीय तरुणीवर बलात्कार झाल्याची घटना घडली आहे. बुधवारी (26 फेब्रुवारी) पहाटे 5.30वाजता ही घटना घडली. दत्तात्रय गाडे असे आरोपीचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध जबरी चोरीचे दोन गुन्हे दाखल आहेत. आरोपी सध्या फरार आहे.
ही तरुणी फलटणला जाण्यासाठी पहाटे साडेपाचच्या सुमारास स्वारगेट बसस्थानकावर आली. तिला एकाने फलटणला जाणारी गाडी इकडे लागत नाही़ तिकडे लागते, असे सांगितले. त्यावर या तरुणीने इकडेच फलाटावर लागते, असे सांगितले. त्यावर त्याने तिला मी १० वर्षे इथे आहे. तिकडे लागणारी बसच फलटणला जाते, असे सांगून तिला आडबाजूच्या शिवशाही बसमध्ये नेले. ही तरुणी बसमध्ये गेली. तेव्हा तिच्या मागोमाग तो आत आला. त्याने दरवाजा लावून घेत तिच्यावर बलात्कार केला. या घटनेनंतर ही तरुणी फलटणला जाण्यासाठी निघाली. अर्ध्या वाटेवरुन ती परत आली आणि तिने स्वारगेट पोलीस ठाण्यात या घटनेची माहिती दिली स्वारगेट पोलिसांनी तातडीने तेथील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले. तेव्हा आरोपीविषयी माहिती कळली. पोलिस त्याचा शोध घेत आहेत.