स्वरगंधर्व, दिवंगत गायक मुकेश यांच्या चौकाचे आज लोकार्पण

 स्वरगंधर्व, दिवंगत गायक मुकेश यांच्या चौकाचे आज लोकार्पण

मुंबई दि.26(एम एमसी न्यूज नेटवर्क): स्वरांचे सम्राट अशी ख्याती असलेले दिवंगत गायक मुकेशचंद्र माथुर उर्फ मुकेश यांच्या स्मरणार्थ नेपियन सी परिसरात लक्ष्मीबाई जगमोहनदास मार्गावर स्थित मुकेश चौकाचे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या डी विभागामार्फत सुशोभीकरण करण्यात आले आहे. तसेच मुकेश यांच्या स्मरणार्थ तेथे प्रकाशित फलक देखील लावण्यात आला आहे. मंगळवारी २७ ऑगस्ट रोजी मुकेश यांची ४८ वी पुण्यतिथी आहे. या दिवसाचे औचित्य साधून या सुशोभीत चौकाचे लोकार्पण राज्याचे कौशल्य विकास उद्योजकता व नाविन्यता मंत्री तथा मुंबई उपनगरे जिल्हा पालकमंत्री व स्थानिक आमदार मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते उद्या मंगळवार, २७ रोजी सायंकाळी ६ वाजता करण्यात येणार आहे.

स्वरगंधर्व, दिवंगत गायक मुकेश यांना अभिवादन म्हणून तसेच संगीत क्षेत्रातील त्यांच्या अविरत योगदानाबाबत मानवंदना म्हणून सदर कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. मुकेश यांचे पुत्र व सुप्रसिद्ध गायक नितीन मुकेश, नातू व प्रसिद्ध सिनेअभिनेता नील नितीन मुकेश, कुटुंबीय व विविध मान्यवर यांची यावेळी उपस्थिती लाभणार आहे.

या चौक सुशोभीकरणाची संकल्पना स्थानिक आमदार या नात्याने श्री. मंगल प्रभात लोढा यांनी मांडली होती. महानगरपालिकेच्या उप आयुक्त (परिमंडळ १) डॉ. (श्रीमती) संगीता हसनाळे यांच्या मार्गदर्शनाखाली डी विभागाच्या माध्यमातून हे सुशोभीकरण साकारण्यात आले आहे.

या सुशोभीकरण अंतर्गत सुमारे २५ फूट लांब व १२ फूट उंच आकाराचे प्रकाशित फलक (Glow Sign Board) साकारताना मुकेश यांच्या कुटुंबीयांनीही योगदान दिले आहे. हे प्रकाशित फलक (Glow Sign Board) तयार करताना मुकेश यांचे नाव कलात्मक व सुंदररीत्या मांडण्यात आले आहे. भौगोलिक सीमेची बंधने ओलांडतानाच जगभरातील चाहत्यांच्या मनात अजरामर जागा मिळवलेल्या मुकेश यांच्या स्वरांना त्यांच्या चाहत्यांकडून गत कित्येक दशके मिळालेल्या प्रतिसादाची प्रतिकृती जणू या प्रकाशित फलकाच्या माध्यमातून दर्शवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. मुकेश यांनी गायलेल्या असंख्य गाण्यांपैकी ‘जग मे रहे जाएंगे प्यारे तेरे बोल..’ ही सुप्रसिद्ध ओळदेखील या प्रकाशित फलकाची भाग ठरली आहे, हे विशेष!

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *