स्वच्छ सर्वेक्षणात उत्तम कामगिरीसाठी बृहन्मुंबई ‘स्वच्छ आणि सुंदर’ ठेवण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे
मुंबई, 3
केंद्र शासनाकडून स्वच्छ सर्वेक्षण २०२५-२६ चा कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे. यंदाच्या स्वच्छ सर्वेक्षणात बृहन्मुंबईची उत्तम कामगिरी असावी, यासाठी संपूर्ण मुंबई महानगरात स्वच्छता राखून नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. (श्रीमती) अश्विनी जोशी यांनी महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने केले आहे. तसेच, बृहन्मुंबई महानगरपालिकेतील घनकचरा, पर्जन्यजल, मलनिस्सारण प्रचालन, मुंबई सांडपाणी विल्हेवाट प्रकल्प, शिक्षण आदी विभागांनी बृहन्मुंबई क्षेत्रात स्वच्छ सर्वेक्षणासाठी उत्तम समन्वयातून प्रभावी उपाययोजना कराव्यात. मूल्यमापन व अहवालासाठी आवश्यक असलेली सर्वसमावेशक, अचूक व अद्ययावत माहिती संकलित करावी, असे निर्देशही श्रीमती जोशी यांनी दिले आहेत.
स्वच्छ सर्वेक्षणाच्या अनुषंगाने, बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयात काल (दिनांक ०२ फेब्रुवारी २०२६) बैठक पार पडली. त्यावेळी त्या बोलत होत्या. उपायुक्त (घनकचरा व्यवस्थापन) श्री. किरण दिघावकर यांच्यासह विविध विभागांतील अधिकारी यावेळी उपस्थित होते.
केंद्र शासनाच्या गृहनिर्माण आणि नागरी कार्य मंत्रालयाच्या वतीने शहरांमधील स्वच्छता, कचरा व्यवस्थापन आणि नागरिक सहभागाचे मूल्यांकन करून क्रमवारी लावण्याच्या उद्देशाने दरवर्षी स्वच्छ सर्वेक्षणाचे आयोजन केले जाते. यंदा स्वच्छ सर्वेक्षणाचे दहावे वर्ष आहे. उत्तम स्वच्छता, कचरा वर्गीकरण, संकलन आणि वाहतूक, प्रक्रिया आदी बाबींवर या अंतर्गत मूल्यमापन केले जाते.
स्वच्छ सर्वेक्षण २०२५-२६ साठी केंद्र शासनाकडून ‘स्वच्छता की नई पहल-बढाए हाथ, करे सफाई साथ’ ही मध्यवर्ती संकल्पना मांडण्यात आली आहे. या अंतर्गत, स्वच्छतेसंदर्भात नागरिकांचा अभिप्राय आणि पडताळणीला अधिक महत्व देण्यात आले आहे. यानुसार, संकेतस्थळ आणि अॅप्सच्या माध्यमातून वर्षभर डिजिटल अभिप्राय संकलित केले जातील. उघड्यावर शौच व लघवी करण्यावर प्रतिबंधाच्या अनुषंगाने नवीन मानके निश्चित करण्यात आली आहेत. तसेच, शाळांमधील वर्तन बदल कार्यक्रमांवर (Behaviour Change Programs) भर देण्यात येत आहे. यंदाच्या सर्वेक्षणात किनारपट्टीवरील शहरांसाठी स्वतंत्र मूल्यांकन निकष लावण्यात आले आहेत. पर्यटन / वारसा / धार्मिक स्थळे आणि जास्त वर्दळीची सार्वजनिक ठिकाणे यांच्याशी संबंधित स्वच्छतेच्या निकषांवरही विशेष भर देण्यात आला आहे.
या पार्श्वभूमीवर पार पडलेल्या बैठकीत डॉ. अश्विनी जोशी यांनी सांगितले की, बृहन्मुंबई (मुंबई शहर आणि उपनगरे) क्षेत्रातील घनकचऱ्याचे प्रभावी आणि शास्त्रोक्त पद्धतीने योग्य व्यवस्थापन करण्यासाठी घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून अविरतपणे प्रयत्न केले जात आहेत. स्वच्छ सर्वेक्षणात या प्रयत्नांचे योग्य मूल्यमापन दिसण्यासाठी प्रभावीपणे उपाययोजना करणे आवश्यक आहे. यासाठी, घनकचरा व्यवस्थापन, मलनिस्सारण प्रचालन व प्रकल्प, मुंबई सांडपाणी विल्हेवाट प्रकल्प, पर्जन्य जलवाहिनी तसेच शिक्षण विभाग आदी विभागांनी समन्वयातून प्रभावी उपाययोजना कराव्यात. मूल्यमापन व अहवालासाठी आवश्यक असलेली सर्वसमावेशक, अचूक व अद्ययावत माहिती संकलित करावी. तसेच, यंदा सर्वेक्षणात नागरिक सहभाग व शाळा-आधारित उपक्रमांवर विशेष भर देऊन नागरिक व विद्यार्थ्यांचा या प्रक्रियेत सहभाग सुनिश्चित करावा. विद्यार्थ्यांमध्ये बालवयातच स्वच्छतेच्या सवयी रुजल्या तर सामाजिक स्तरावर दीर्घकालीन व शाश्वत वर्तनबदल घडतो. यामुळे, नागरी स्वच्छतेला हातभार लागतो. नागरिकांनीही स्वच्छतेला प्राधान्य देत महानगरपालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन डॉ. अश्विनी जोशी यांनी यावेळी केले.
मुंबईकर नागरिकांना आवाहन करत डॉ. जोशी म्हणाल्या की, स्वच्छता राखण्यासाठी नागरिकांचे सहकार्य आणि स्वच्छता उपक्रमांत त्यांचा सहभाग फार महत्वाचा आहे. आपले घर, परिसर, सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ राहावीत, यासाठी नागरिकांनी प्रयत्न करावेत. निवासी संकुलांमध्येच कचऱ्यावर प्रक्रिया करुन त्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावावी. प्रशासनाकडून स्वच्छतेसंदर्भात राबविल्या जाणाऱ्या उपक्रमांमध्ये सहभागी व्हावे. तसेच, कचरा करणाऱ्यांना परावृत्त करावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.KK/ML/MS