दापोली तालुक्यातील सुवर्णदुर्ग किल्ल्याला मिळणार ‘वर्ल्ड हेरीटेज’चा दर्जा

 दापोली तालुक्यातील सुवर्णदुर्ग किल्ल्याला मिळणार ‘वर्ल्ड हेरीटेज’चा दर्जा

मुंबई, दि. ९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कोकणातील दापोली तालुक्यातील हर्णें जवळील समुद्रातील सुवर्णदुर्ग हा शिवकालीन किल्ला आजही दिमाखात उभा आहे. राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुवर्णदुर्ग किल्ल्याला वर्ल्ड हेरिटेज साईटचा दर्जा देण्यात येणार आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाकडून हालचालींना वेग आला आहे. संयुक्त राष्ट्र शैक्षणिक, वैज्ञानिक व सांस्कृतिक संस्था (युनेस्कोने) या जलदुर्गाची पाहणी केली होती. त्यानुसार लागणाऱ्या सोयीसुविधा, बेकायदेशीर बांधकामे हटवणे, पाणी, शौचालय, पार्किंग आदी गोष्टीचे नियोजन करण्यासाठी जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांच्या नेतृत्वाखाली विविध विभागांच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली. या सुविधा पूर्ण झाल्यास सुवर्णदुर्ग किल्ला पर्यटनाच्यादृष्टीने जागतिक पातळीवर जाईल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.

सुवर्णदुर्गाचे प्रवेशद्वार छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधून घेतल्याचा इतिहास आहे. इ. स. १६६० मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला आदिलशाहीकडून जिंकून घेतला होता. या किल्ल्याच्या डागडुजीसाठी आणि पुनर्रचनेसाठी दहा हजार होन खर्च केले, असा ऐतिहासिक कागदपत्रांत उल्लेख असल्याचे सांगितले जात आहे.

भारत सरकारने या किल्ल्याला महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे. या किल्ल्याला वर्ल्ड हेरिटेज साईट दर्जा देण्याच्यादृष्टीने युनेस्को संस्थेने नुकतीच या किल्ल्याची पाहणी करून काही सुधारणा आणि सुविधा सुचवल्या होत्या. जिल्हा प्रशासनाकडून येथील नियोजन आराखडा तयार करण्याच्यादृष्टीने हर्णे आणि सुवर्णदुर्ग किल्ल्याची पाहणी केली. आता प्रशासनाकडून युनेस्कोला दिलेल्या शब्दाची पूर्तता करणार आहे.

SL/ML/SL

9 Jan. 2025

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *