लोकसभेच्या ३३ तर राज्यसभेच्या ४५ खासदारांचे निलंबन

नवी दिल्ली, दि. १८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या आज ११ वा दिवस आहे. १३ डिसेंबर संसद सभागृहात तरुणांनी केलेल्या घुसखोरीचा मुद्दा उपस्थित करत लोकसभेत सलग चौथ्या दिवशी सुरक्षेच्या मुद्द्यावरून गदारोळ झाला. लोकसभा सभापती ओम बिर्ला यांनी गोंधळ घालणाऱ्या 33 खासदारांना निलंबित केले. यामध्ये नेते अधीर रंजन चौधरी, काँग्रेसचे 11 खासदार, तृणमूल काँग्रेसचे 9, द्रमुकचे 9 आणि इतर पक्षांच्या 4 खासदारांचा समावेश आहे.
यानंतर या मुद्द्यावरुन राज्यसभेतही गदारोळ झाला. त्यामुळे सभापती जगदीप धनखर यांनी 45 विरोधी खासदारांना संपूर्ण अधिवेशनासाठी (22 डिसेंबरपर्यंत) निलंबित केले.
यापूर्वी 14 डिसेंबर रोजी लोकसभेतून 13 खासदारांना निलंबित करण्यात आले होते. यामध्ये काँग्रेसचे 9, माकपचे 2, द्रमुक आणि सीपीआयच्या प्रत्येकी एक खासदारांचा समावेश होता. आत्तापर्यंत एकूण 46 लोकसभा खासदारांना संपूर्ण हिवाळी अधिवेशनासाठी निलंबित करण्यात आले आहे. याशिवाय राज्यसभा खासदार डेरेक ओब्रायन यांनाही 14 डिसेंबर रोजी निलंबित करण्यात आले होते.
लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी आज कामकाज सुरू होताच सभागृहात 15 मिनिटांचे भाषण केले. या घटनेवरून राजकारण होणे दुर्दैवी असल्याचे ते म्हणाले. गोंधळ वाढल्याने सभागृहाचे कामकाज दुपारी बारा वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले. नंतर ते दुपारी 2 वाजेपर्यंत आणि नंतर उद्यापर्यंत तहकूब करण्यात आले. खासदारांच्या निलंबनानंतर सभागृहाचे कामकाज उद्यापर्यंत तहकूब करण्यात आले.
SL/KA/SL
18 Dec. 2023