सुशीला कार्की ठरल्या नेपाळच्या पहिल्या महिला पंतप्रधान

काठमांडू,दि. १३ : नेपाळच्या राजकारणात ऐतिहासिक पाऊल उचलत माजी सरन्यायाधीश सुशीला कार्की यांना देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान होण्याचा मान मिळाला आहे. काल (12 सप्टेंबर ) रोजी नेपाळच्या राष्ट्रपती भवनात झालेल्या शपथविधी सोहळ्यात त्यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली. विशेष म्हणजे एखाद्या डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे पंतप्रधानांची निवड होण्याची ही पहिलीच वेळ आहे. या आंदोलक तरुणांनी पारंपरिक राजकारण्यांवर विश्वास नसल्याने एक अनोखी वाट निवडली. ‘युथ अगेन्स्ट करप्शन’ नावाच्या एका डिस्कॉर्ड सर्व्हरवर त्यांनी नेपाळच्या पुढील नेत्याची निवड करण्यासाठी मतदान घेतले. या सर्व्हरवर 1,30,000 पेक्षा जास्त सदस्य होते. या मतदानात सुशीला कार्की यांना 50% पेक्षा जास्त मते मिळाल्यावर 7,713 लोकांनी त्यांच्या नावाला पसंती दिली. यानंतरच त्यांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा झाला.
यापूर्वी कार्की यांनी 2016 ते 2017 या कालावधीत नेपाळच्या सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश म्हणून काम पाहिले होते, आणि आता त्या कार्यकारी प्रमुख म्हणून देशाचे नेतृत्व करणार आहेत. सुशीला कार्की यांची निवड नेपाळमध्ये सुरू असलेल्या राजकीय अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर झाली. सोशल मीडियावर बंदी आणि भ्रष्टाचारविरोधी आंदोलनामुळे जन झी या तरुण गटाने सरकारविरोधात तीव्र आंदोलन छेडले होते. या आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसाचारात अनेक नागरिकांचा मृत्यू झाला, आणि त्यानंतर पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांच्यासह संपूर्ण मंत्रिमंडळाने राजीनामा दिला. या परिस्थितीत अंतरिम सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि सुशीला कार्की यांना नेतृत्वाची जबाबदारी सोपवण्यात आली.
शपथविधीनंतर कार्की यांनी भारत-नेपाळ संबंधांबाबत सकारात्मक भूमिका मांडली. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, भारताने नेहमीच नेपाळला मदत केली असून दोन्ही देशांमध्ये प्रेम आणि आपुलकीचे नाते आहे. “भारतीय मित्र मला बहिणीसारखे मानतात,” असे भावनिक उद्गार त्यांनी काढले. भारताशी असलेल्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक संबंधांना अधिक दृढ करण्याचा आपला प्रयत्न राहील, असेही त्यांनी नमूद केले.
सुशीला कार्की यांचे शिक्षण भारतातील बनारस हिंदू विद्यापीठात झाले असून त्यांनी 1979 साली वकिली सुरू केली होती. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी भ्रष्टाचाराविरोधात कठोर भूमिका घेतली होती, ज्यामुळे त्यांच्यावर महाभियोगही आणण्यात आला होता. मात्र त्यांच्या निर्भीड आणि पारदर्शक कार्यशैलीमुळे जनतेमध्ये त्यांच्याबद्दल आदर निर्माण झाला.
नेपाळच्या राजकारणात महिलांचे प्रतिनिधित्व वाढवण्याच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. सुशीला कार्की यांचे नेतृत्व नेपाळला नव्या दिशेने घेऊन जाणार का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल. त्यांच्या निवडीमुळे देशात लोकशाही प्रक्रियेवर विश्वास वाढला असून नव्या युगाची सुरुवात झाली आहे.