रत्नागिरी जिल्ह्यातील ४८ गावांचे आंबा मोहोर समितीद्वारे सर्वेक्षण

रत्नागिरी, दि. १७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : हवामानबदल आणि अवकाळी पावसामुळे कोकणातील आंबा उत्पादक गेल्या काही वर्षांपासून चिंतेच्या सावटाखाली आहेत. यावर्षी देखील जानेवारी महिन्यात झालेला अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरण यामुळे सध्या हापूस आंबा मोहरावर व फळधारणेवर थ्रीप्स (फुलकिडी), तुडतुड्याचा परिणाम झालेला आहे. आंबा मोहर समितीने जिल्ह्यातील ४८ गावांत केलेल्या सर्व्हेक्षणाअंती प्राथमिक अहवाल कृषी विभागाकडे सादर केलेल्या अहवालात हे निरिक्षण नोंदवण्यात आले आहे. समितीने रत्नागिरी तालुक्यात पावस, मालगुंड, हरचेरी, तसेच गुहागर, दापोली, राजापूर या प्रामुख्याने हापूस लागवड क्षेत्रातील ४८ गावांमध्ये सर्वेक्षण केले. हा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी फवारणीबरोबरच तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली सर्व खबरदारी घेण्याचा सल्ला समितीने दिला आहे.
यंदा पावसाचे प्रमाण कमी असल्यामुळे ऑक्टोबर हीट देखील वाढली आहे. नोव्हेंबरमध्ये थंडी सुरू होताच आंब्याला मोहर सुरू झाला. मात्र जानेवारीमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे मोहरावर परिणाम झाला. काही ठिकाणी मोहर खराब झाला. दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यात मोहर मात्र टिकून आहे. पहिल्या मोहोराचा आंबा पाच ते दहा टक्केच शिल्लक राहिला आहे. यामुळे हा शिल्लक मोहोर टिककण्यासाठी आंबा उत्पादक कसोशीने प्रयत्न करत आहेत.
दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यात सर्वत्र मोहर चांगला आहे. काही ठिकाणी फळधारणा अद्याप व्हायची आहे. काही ठिकाणी कणी, तर काही ठिकाणी सुपारी एवढा आंबा झाडावर आहे. हा आंबा मार्चमध्ये बाजारात येण्याची शक्यता आहे. दोन आठवड्यांपूर्वी तुडतुड्याचा प्रादुर्भाव झाला होता. मात्र, बागायतदारांनी योग्य उपाययोजना केल्याने तुडतुडा आटोक्यात आणण्यात यश आले होते; परंतु तुडतुडा व फुलकिडीचा प्रादुर्भाव वारंवार होत असल्याने शेतकऱ्यांना या किडी आटोक्यात आणणे अवघड बनले आहे. कीटकनाशकांचा प्रभाव पडत नसल्याने समस्येत भर पडली असून फवारणींची संख्या वाढली आहे. पाऊस आणि ढगाळ हवामानामुळे बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढल्याची नोंदही समितीने अहवालात केली आहे.
SL/KA/SL
17 Feb. 2024