श्रीरंग सुर्वे यांना ‘कोकण रत्न’ पुरस्कार जाहीर
मुंबई, दि. २६ : गेल्या सुमारे ३० वर्षांहून अधिक काळ पत्रकारितेत कार्यरत असणारे कोकणचे सुपुत्र श्रीरंग सुर्वे यांना ‘कोकण रत्न’ पुरस्कार जाहीर झाला आहे. स्वतंत्र कोकण राज्य अभियानाचे अध्यक्ष संजय कोकरे यांनी या पुरस्काराची घोषणा केली.
कोकणच्या दृष्टीने प्रतिष्ठित असलेल्या पुरस्काराची घोषणा करताना श्रीरंग सुर्वे यांनी त्यांच्या पत्रकारितेच्या माध्यमातून केलेल्या समाजसेवेची नोंद घेतल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. श्रीरंग सुर्वे यांनी मुंबई महानगर पालिका वार्ताहर संघाचे सरचिटणीस, उपाध्यक्ष, सल्लागार अशी विविध पदे भूषविली आहेत. कोविड काळात केलेल्या कामाची पोचपावती म्हणून त्यांना प्रतिष्ठित अशा रत्ननिधी चॅरिटेबल ट्रस्ट कडून गौरविण्यात आले आहे. ते वास्तव्यास असलेल्या विभागातही त्यांनी समाजसेवा जोपासली आहे.
पत्रकारितेच्या माध्यमातून अनेक विषयांवर आपली मते परखडपणे आपल्या लेखणीतून श्रीरंग सुर्वे यांनी व्यक्त केली आहेत. कोकणात पर्यटन मोठ्या प्रमाणावर वाढावे यासाठीही त्यांनी विशेष लेख लिहिले आहेत. श्रीरंग सुर्वे यांच्या या सर्व योगदानाचा विचार करून संजय कोकरे यांनी त्यांची पुरस्कारासाठी निवड केली आहे. हा पुरस्कार वितरण समारंभ येत्या १३ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी मुंबई मराठी पत्रकार संघ येथे होणार आहे.ML/ML/MS