ज्येष्ठ समाजवादी नेते पन्नालाल सुराणा यांचे निधन
छ संभाजीनगर दि ३ : राष्ट्र सेवा दलाचे माजी अध्यक्ष, आपलं घर नळदुर्ग चे आधारवड, पन्नालाल सुराणा
यांचे दिनांक 2 डिसेंबर 2025 रोजी रात्री 9:30 च्या दरम्यान नळदुर्ग होऊन सोलापूरला नेत असताना वाटेत निधन झाले. त्यांचे वय 93 वर्ष होते. त्यांचे देहदान सोलापूर सिव्हिल मेडिकल कॉलेजला सकाळी देहदान करण्यात आले.
पन्नालाल भाऊ हे दैनिक मराठवाडा चे माजी संपादक, ग्रामोदय समिती कुर्डवाडी चे अध्यक्ष, ज्येष्ठ समाजवादी विचारवंत,साहित्यिक, वक्ते होते. सात सप्टेंबर 93 साली झालेल्या भूकंपानंतर पन्नालाल सुराणा यांनी नळदुर्ग जवळ आपलं घर नावाचा मोठा प्रकल्प उभारून भूकंपग्रस्तांच्या मुलांचे पुनर्वसन आणि शिक्षणाची व्यवस्था देखील केली होती.
त्यांच्या सामाजिक कार्याविषयी माहिती देणारा हा वृत्तांत
पन्नालाल सुराणा यांचा जन्म – ९ जुलै १९३३ रोजी झाला. ते धाराशिव जिल्ह्य़ातील परांडा तालुक्यातील आसू या गावचे रहिवासी होते. पन्नालाल सुराणा हे शाळेत असताना राष्ट्रसेवादलात दाखल झाले. पुढे तरुणपणी त्यांनी जयप्रकाश नारायण यांच्या बिहारमधील सोखादेवरा येथील सर्वोदय आश्रमात राहून भूदान चळवळीत भाग घेतला. समाज प्रबोधन संस्थेचे सचिव म्हणून आणि समाजवादी पक्षाच्या राज्य शाखेचे सचिव म्हणूनही त्यांनी काम पाहिले. ते सोशालिस्ट फ्रन्टचे राष्ट्रीय सचिव आणि साने गुरुजी कथामालेचे अध्यक्ष राहिले. त्यांनी राजकीय, आर्थिक, वैज्ञानिक विषयांवर चाळीस पुस्तके लिहिली आहेत. १९८६ ते ९३ या काळात ते दैनिक मराठवाडाचे संपादक होते.
दुष्काळ निवारण, निर्मूलन, शेतकरी-शेतमजुरांच्या हक्कासाठी त्यांनी आंदोलने केली आहेत. आणीबाणीच्या काळात ते भूमिगत होते. त्यानंतर त्यांना अटक झाली होती. भूमिमुक्ती आंदोलनात त्यांना चार वेळा तुरुंगवास झाला. लातूर भूकंपात निराधार झालेल्या मुलांसाठी त्यांनी धाराशिव जिल्ह्यात नळदुर्गजवळ ‘आपलं घर’ ही शाळा सुरू केली. पर्यावरण आणि जलसंधारणाच्या क्षेत्रातही त्यांनी उल्लेखनीय काम केलेले आहे. पन्नालाल भाऊ सुराणा यांनी 40 पुस्तक लिहिली यात
कथा वीणाची -पत्नी वीणा पुरंदरे-सुराणा यांचे चरित्र
कारगिल आणि भारताची संरक्षणसिद्धता
गांधीजींची ओळख
ग्यानबाचं अर्थकारण
बुलंद आवाज बाईचा हे प्रमिला दंडवते यांचे चरित्र
महात्मा गांधी आणि दलित समस्या
शहा आयोग – शोध आणि बोध
शाळा म्हणजे घर, घर म्हणजे शाळा हे बालसाहित्य
या साहित्य कृतींचा समावेश आहे. त्यांना मारवाडी फाऊंडेशनचा प्रबोधनकार ठाकरे समाज प्रबोधन पुरस्कार मिळाला होता.ML/ML/MS