सुप्रिया सुळे, शशी थरूरांसह आणखी ४९ खासदारांचे निलंबन
नवी दिल्ली, दि. १९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : संसदेच्या सुरक्षेच्या कारणांवरुन सभागृहात सुरु असलेला विरोधीपक्षाच्या खासदारांचा गदारोळ आजही सुरुच होता. आज लोकसभेत गोंधळ घालणाऱ्या ४९ खासदारांना निलंबित करण्यात आलं आहे. त्यामुळे निलंबित करण्यात आलेल्या खासदारांची संख्या १४१ पर्यंत पोहोचली आहे.
विशेष म्हणजे आज निलंबनाची कारवाई झालेल्या खासदारांमध्ये काँग्रेस नेते शशी थरूर, मनिष तिवारी, कार्ति चिदंबरम, एम. डी फैजल, फारूक अब्दुल्ला, सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे, दानिश अली, माला रॉय, डिपंल यादव, सुशील कुमार रिंकू यांच्यासह ४९ जणांचा समावेश आहे.
शुक्रवारी ( दि. १५ ) लोकसभेतील १३ आणि राज्यसभेतील १ खासदाराचं निलंबन करण्यात आलं होतं. त्यानतंर सोमवारी ( दि. १८) लोकसभेतील ३३, तर राज्यसभेतील ४५ अशा ७५ खासदारांना निलंबित करण्यात आलं. आता ( दि. १९ ) लोकसभेतील ४९ खासदारांचं निलंबन करण्यात आलं आहे. त्यामुळे हिवाळी अधिवेशनात निलंबित करण्यात आलेल्या खासदारांची संख्या १४१ वर पोहोचली आहे.
निलंबन झाल्यानंतर सुप्रिया सुळे माध्यमांशी बोलताना म्हणाल्या की, “ही दडपशाही आहे. लोकशाहीच्या मार्गाने आम्ही सगळे निवडून आलोय आणि आमचा आवाज दाबला जातोय. संसदेवर झालेल्या हल्ल्याची चर्चा करण्याची मागणी आम्ही करत होतो. आम्हाला वाटत होतं की देशाच्या गृहमंत्र्यांनी आमच्याशी चर्चा करायला पाहिजे. नेमकं काय झालं आणि पुढे काय करणार एवढंच सांगणं त्यांनी अपेक्षित होतं. हा केवळ खासदारांच्या सुरक्षेचा विषय नाहीये. ही दडपशाही सुरु आहे. आमचं काय चुकलं? शंभरहून जास्त खासदार निलंबित करण्यात आले आहेत.
“संसद चालवणं ही सरकारची जबाबदारी आहे. आम्ही चर्चेसाठी तयार आहोत. पण सरकारलाच संसद चालवायची नाहीये. त्यांना सभागृहात विरोधकच नको आहेत. भाजप विरोधात होता तेंव्हा आम्ही लोकांना अशा पद्धतीने बाहेर काढलं नव्हतं.
“आम्ही घोषणा दिल्या आणि चर्चेची मागणी केली हा आरोप ठेवून आम्हाला आज निलंबित करण्यात आलं. गृहमंत्र्यांनी एक छोटंसं स्पष्टीकरण दिलं असतं तरी आम्ही शांत झालो असतो. संसदेत घुसखोरी केलेल्यांना पास कुणी दिला याची माहिती मागत होतो.”
“मी आणीबाणी पाहिली नाही, पण ही आणीबाणीसारखी परिस्थिती आहे. हा संविधानाचा अपमान आहे,” असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.
SL/KA/SL
19 Dec. 2023