ईडीच्या कामगिरीबाबत सर्वोच्च न्यायालय नाराज

नवी दिल्ली, दि. २१ : ईडीने काही वकिलांना समन्स पाठवण्यात आले होते. आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप असलेल्या आरोपींना वकिलांनी सल्ला दिला म्हणून हे समन्स जारी केले होते. या समन्सविरोधात संबंधित वकिलांनी थेट सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती. याच प्रकरणावर सुनावणी घेताना सर्वोच्च न्यायालयाने ईडी आपल्या सर्व मर्यादा ओलांडत आहे, अशी टिप्पणी केली. तसेच यासंदर्भात ईडीसाटी काही मार्गदर्शक सूचना असायला हव्यात, असंही न्यायालयाने म्हटलं. सरन्यायाधीश भूषण गवई, न्यायमूर्ती विनोद चंद्रन यांच्या द्विसदस्यीय खंडपीठाने या प्रकरणाची स्वत: दखल घेत सुनावणी घेतली होती.
ईडीच्या अशा भूमिकेमुळे वकिली पेशाची स्वतंत्रताही बाधित होईल, असे मत सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केले. ईडीने वरिष्ठ वकील अरविंद दातार तसेच प्रताप वेणुगोपाल यांना समन्स जारी केले होते. याच समन्सविरोधात सरन्यायाधीशांनी अनेक प्रश्न उपस्थित केले. ‘एक वकील आणि त्याच्या क्लायंटमधील संवादावरून नोटीस कशी दिली जाऊ शकते. ईडी सर्व मर्यादा ओलांडत आहे,’ अशी टिप्पणी सर्वोच्च न्यायालयाने केली. तसेच अशा प्रकारच्या नोटिशी जारी झाल्या तर वरिष्ठ वकिलांच्या वकिलीवर प्रभाव पडू शकतो. त्यामुळे या संदर्भात ईडीसाठी काहीतरी मार्गदर्शक सूचना असायला हव्यात, असे मत यावेळी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केले.
SL/ML/SL