निवडणूक आयोगाच्या निवेदनाची सर्वोच्च
न्यायालयाकडून दखल

नवी दिल्ली, दि. १९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : निवडणूक आयोगाच्या वेबसाइटवर बूथनिहाय मतदानाच्या टक्केवारीचा डेटा अपलोड करण्याच्या मागणीवर विचार करण्यास तयार असल्याच्या आयोगाच्या निवेदनाची सर्वोच्च न्यायालयाने दखल घेतली. न्यायालयाने याचिकाकर्त्यांना १० दिवसांच्या आत निवडणूक आयोगाकडे त्यांचे निवेदन सादर करण्यास सांगितले. मुख्य न्यायाधीश संजीव खन्ना, न्यायमूर्ती संजय कुमार आणि न्यायमूर्ती के. व्ही. विश्वनाथन यांच्या खंडपीठासमोर २०१९ मध्ये तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा आणि एनजीओ असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स यांनी दाखल केलेल्या दोन जनहित याचिकांवर सुनावणी सुरू होती.
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये मतदान संपल्यानंतर ४८ तासांच्या आत आयोगाच्या वेबसाइटवर बूथनिहाय मतदान टक्केवारीची माहिती अपलोड करण्याचे निर्देश निवडणूक आयोगाला द्यावेत, अशी मागणी या जनहित याचिकांमध्ये करण्यात आली होती. निवडणूक आयोगाकडून बाजू मांडणारे वरिष्ठ वकील मनिंद्र सिंह म्हणाले की, मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार याचिकाकर्त्यांना भेटून तक्रारीवर चर्चा करू इच्छितात. ते म्हणाले की, आता एक नवीन मुख्य बूथनिहाय टक्केवारी देण्याबाबत विचार निवडणूक आयुक्त करीत आहेत. याचिकाकर्ते त्यांना भेटू शकतात आणि त्यावर विचार केला जाऊ शकतो. अहवाल १० दिवसांच्या आत सादर करावा. गेल्या वर्षी १७ मे रोजी सर्वोच्च न्यायालयाने या याचिकांवर निवडणूक आयोगाकडून उत्तर मागितले होते, त्यानंतर आयोगाने एनजीओच्या मागणीला विरोध करत म्हटले होते की यामुळे निवडणुकीचे वातावरण बिघडेल.
VB/ML/SL
19 March 2025