कृष्ण जन्मभूमी खटल्यात हस्तक्षेप करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

नवी दिल्ली, दि. १५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मथुरेतल्या शाही ईदगाह मशिदीचं वैज्ञानिक सर्वेक्षण करण्याचा मार्गातील सर्व अडथळे आता दूर झाले आहेत. काल यावर निकाल देताना अलाबाबाद उच्च न्यायालयाने वैज्ञानिक सर्वेक्षणास परवानगी दिली. त्यानंतर मुस्लीम पक्षकारांनी आज सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. परंतु, सर्वोच्च न्यायालयाने अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास नकार दिला आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयाने मशिदीच्या वैज्ञानिक सर्वेक्षणास स्थगिती दिली नाही.
शाही ईदगाह मशीद ही कृष्ण जन्मभूमीवर उभारण्यात आली आहे असा दावा करत हिंदू संघटनांनी केला आहे. तसेच या मशीद परिसराचं वैज्ञानिक सर्वेक्षण करण्याची मागणी करणारी याचिकाही त्यांनी अलाहाबाद उच्च न्यायायात दाखल केली होती.
शाही ईदगाह मशीद परिसराचं न्यायालयाच्या देखरेखीखाली अधिवक्ते आणि आयुक्तांच्या तीन सदस्यीय पथकाकडून प्राथमिक सर्वेक्षण केलं जाईल. आयुक्तांसह या सर्वेक्षणात किती लोक सहभागी होतील? सर्वेक्षण कधी सुरू केलं जाईल? मशीद परिसरातील कोणकोणत्या भागांचं सर्वेक्षण केलं जाईल? याबाबतचा निर्णय १८ डिसेंबर रोजी घेतला जाईल.
भगवान श्री कृष्ण विराजमान ट्रस्ट आणि इतर सात जणांनी विधीज्ञ हरी शंकर जैन, विष्णू शंकर जैन, प्रभाष पांडे आणि देवकी नंदन यांच्या माध्यमातून अलाहाबाद उच्च न्यायालयात मशिदीच्या वैज्ञानिक सर्वेक्षणाची मागणी करणाऱ्या याचिका दाखल केल्या होत्या. हिंदू संघटनांनी म्हटलं आहे की, ही भूमी (शाही ईदगाह मशीद असलेली जागा) भगवान श्रीकृष्णाचं जन्मस्थान आहे. येथे पूर्वी श्रीकृष्णाचं भव्य मंदिर होतं. मुघल बादशाह औरंगजेबाच्या आदेशानंतर मुघलांनी हे मंदिर पाडून तिथे मशीद बांधली.
शाही ईदगाह मशिदीच्या सर्वेक्षणाआधी वाराणसीतल्या ज्ञानवापी मशीद परिसराचं एएसआय सर्वेक्षण करण्यात आलं होतं. न्यायालयाने नियुक्त केलेल्या आयुक्तांच्या देखरेखीखालीच हेदेखील सर्वेक्षण करण्यात आलं.
दरम्यान, हिंदू पक्षकारांनी मागणी केली होती की शाही ईदगाह मशीद परिसराचं सर्वेक्षण करताना व्हिडीओ कॅमेऱ्याद्वारे चित्रण केलं जावं. तसेच फोटोही काढावेत. हिंदू पक्षकारांनी दावा केल्याप्रमाणे शाही ईदगाह परिसरात हिंदूंची प्रतीकं, चिन्हं आणि मंदिर पाडून त्याच जागी मशीद बांधल्याचे पुरावे शोधण्याचं काम या एएसआय सर्वेक्षणाद्वारे केलं जाईल.
SL/KA/SL
15 Dec. 2023