राहुल नार्वेकरांना सर्वोच्च न्यायालयाकडून नोटीस
नवी दिल्ली, दि. १४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अन्य शिवसेना आमदारांविरोधात अपात्रतेच्या प्रलंबित नोटिशींवर तातडीने निर्णय घेण्याचा निर्देश द्यावेत, अशी मागणी करत ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्या याचिकेवर आज ( १४ जुलै ) सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. दोन आठवड्यांत आपले उत्तर सादर करावे, अशी नोटीस सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना बजावली आहे.
एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून उठाव केल्यानंतर शिवसेनेत उभी फूट पडली होती. एकनाथ शिंदे यांना ज्या आमदारांनी पाठिंबा दिला आहे, त्या आमदारांवर अपात्रतेची कारवाई करण्यात यावी अशी याचिका ठाकरे गटाकडून सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आली होती. या प्रकरणावर निकाल देताना आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांनी घ्यावा असं सुप्रीम कोर्टानं म्हटलं होतं. तसेच तो निश्चित कालावधीमध्ये घेणं अपेक्षीत असल्याचंही सुप्रीम कोर्टानं म्हटलं होतं. मात्र आता सुनावणीस विलंब होत असल्याचा आरोप ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे. या प्रकरणी ठाकरे गटाकडून सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती.
राहुल नार्वेकर यांनी दोन आठवड्याच्या आत उत्तर सादर करावेत असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यामुळे आता पुन्हा एकदा या सर्व प्रकरणाकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.
SL/KA/SL
14 July 2023