सुनील प्रभूंनी खोट्या सह्या करून बनवेगिरी केली…
मुंबई, दि. २३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : शिवसेना ठाकरे गटाच्या सुनील प्रभू यांनी उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करणाऱ्या ठरावावर उदय सामंत, दादा भुसे आणि संजय राठोड यांच्या खोट्या सह्या करून बनवेगिरी केली आहे असा आरोप आज ठाकरे गटाचे वकील महेश जेठमलानी यांनी आमदार अपात्रता सुनावणी दरम्यान केला आहे. आज सलग दुसऱ्या दिवशी प्रभू यांची उलट तपासणी जेठमलानी यांनी घेतली.
आज सकाळपासूनच या उलट तपासणी दरम्यान अनेकवेळा प्रभू आणि जेठमलानी यांच्यात अनेक शाब्दिक खटके उडाले. जेठमलानी यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे थेट न देता प्रभू यांनी वेगळी उत्तरे दिली , त्यामुळे हे खटके उडाले. ज्या पक्षादेशाबद्दल सुनावणी सुरू आहे तो तुम्ही काढलाच नाही आणि ज्यांना अपात्र करण्याची मागणी करीत आहात त्यांना तो बजावलाच नाही असा दावा जेठमलानी यांनी यावेळी केला. याउलट तो आपणच काढला असून आपण काहीना मोबाईल वर तर काहीना आमदार निवासात बजावला होता असे प्रभू म्हणाले.
उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करणाऱ्या ठरावाची मूळ प्रत कुठे आहे असा प्रश्न जेठमलानी यांनी यावेळी केला त्यावर ती तत्कालीन उपाध्यक्ष यांच्याकडे दिल्याचे प्रभू म्हणाले. या ठरावावर आपले अशिल सामंत , भुसे आणि राठोड यांनी सह्याच केलेल्या नाहीत त्यामुळे त्या खोट्या सह्यांसाठी प्रभू जबाबदार असून त्यांनी बनवेगिरी केली असे ते म्हणाले. यावर आपल्या डोळ्यासमोर त्यांनी सह्या केल्या, आपण खोटे बोलत नाही असे प्रभू म्हणाले.
आज दुपारी जेवणाच्या सुट्टीनंतर अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सुनावणी घेण्याच्या तारखा जाहीर केल्या. यानुसार सात तारखेपर्यंत मुंबईत सुनावणी घेऊ असे स्पष्ट करीत २९ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत अधिवेशनाच्या तारखा निश्चित होतील असे ते म्हणाले. जर ११ तारखेला अधिवेशन सुरू करण्याचे ठरले तर सात तारखेपर्यंत आणि सात तारखेला घ्यायचे ठरले तर पाच तारखेपर्यंत सुनावणी घेऊ असे नार्वेकर म्हणाले.
नागपूर अधिवेशनात ही सुनावणी सुरू राहील ती २२ तारखेपर्यंत चालेल. गरज पडल्यास आणखी एक दिवस सुनावणी घेऊ असे नार्वेकर म्हणाले. यात तीस नोव्हेंबर पर्यंत जेठमलानी यांनी आपली उलटतपासणी पूर्ण करावी तर देवदत्त कामत यांनी त्यांची उलट तपासणी एक तारखेपासून पुढील चार दिवसात पूर्ण करावी असे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी यावेळी स्पष्ट केले.
ML/KA/SL
23 Nov. 2023