नागराज मंजुळे यांना समन्स, खाशाबा जाधव चित्रपट वाद

 नागराज मंजुळे यांना समन्स, खाशाबा जाधव चित्रपट वाद

पुणे दि २६– दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी घोषित केलेल्या खाशाबा जाधव यांच्या चित्रपटातील कथा वादाच्या भोवर्‍यात सापडली आहे. मूळ कथा, लेखक संजय दुधाणे यांची असून त्यांनी कॉपीराईटबाबत दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्यासह जिओ स्टुडियो, आटपाट प्रोडक्शन, निर्माती ज्योती देशपांडे यांच्या विरोधात पुणे जिल्हा तथा सत्र न्यायालयात दावा दाखल केला आहे. याबाबत न्यायालयाने दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्यासह सर्वांना समन्स पाठवले आहे.

खाशाबा जाधव यांच्या चरित्र पुस्तकाचे हक्क 2001 पासून संजय दुधाणे यांच्याकडे आहेत. भारत सरकारच्या कॉपीराईट कार्यालयाचे प्रमाणपत्रही दुधाणे यांच्याकडे आहे. चित्रपटाच्या निर्मिती आणि प्रदर्शन करण्यास निरंतर मनाई करण्यासाठी दुधाणे यांच्याकडून अ‍ॅड. रविंद्र शिंदे आणि अ‍ॅड. सुवर्णा शिंदे यांनी पुणे जिल्हा तथा सत्र न्यायालयात दावा दाखल केला आहे. याबाबत जातीने हजर रहाण्याचे समन्स न्यायालयाने दिग्दर्शक नागराज मंजुळे तसेच ज्योती देशपांडे यांना पाठवले आहे.

गेल्या चार वर्षांत स्वतः नागराज मंजुळे यांच्यासोबत 2 बैठका तर त्यांच्या वकिलांसोबत 2 समझोता बैठका अश्या एकूण 4 बैठकीत निर्णय न झाल्याने अखेर लेखक संजय दुधाणे यांनी कॉपीराईट कायद्याचा भंग झाल्याचा दावा दाखल केला आहे. पुणे जिल्हा तथा सत्र न्यायालयाने समन्स पाठवून नागराज मंजुळे, निर्माती ज्योती देशपांडे, जिओ स्टुडियो आणि आटपाट प्रोडक्शन यांना आपली बाजू मांडण्यासाठी समन्स पाठविण्यात आले आहे.

खाशाबा चित्रपटाची मूळ कथा लेखक संजय दुधाणे यांची असताना नागराज मंजुळे यांनी रणजीत जाधव यांच्याशी बेकायदेशीर करार केल्याने हा वाद निर्माण झाला आहे. कोरोनापूर्वी 2019 मध्ये दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी चित्रपटाबाबत खाशाबा जाधव यांचे पुत्र रणजीत जाधव यांच्याशी करार केला होता. मुळात रणजीत जाधव यांनीच 30 ऑगस्ट 2013 रोजी कराड येथे पत्रकार परिषद घेऊन खाशाबांच्या चित्रपटाची कथा ही संजय दुधाणे यांची असल्याचे घोषित केले होते. आता रणजीत जाधव यांनी संजय दुधाणे यांना डावलून संमती करार केल्याने हा वाद निर्माण झाला आहे. ही बाब लेखक संजय दुधाणे यांच्या लक्षात येताच त्यांनी मंजुळे यांची 2020 मध्ये खाशाबा जाधव यांचे पुत्र रणजीत जाधव यांच्यासोबत पुणे भेट घेतली होती. त्यावेळी वाईमधील पट कथालेखक तेजपाल वाघ ही उपस्थित होते. चर्चेत लेखक म्हणून तुमचे नाव दिले जाईल आणि रणजीत जाधव यांच्याप्रमाणेच समान वाटा देऊन तुमचा मान राखला जाईल, असा शब्द नागराज मंजुळे यांनी दिला होता. रणजीत जाधव यांनी या प्रस्तावाला होकार दिला होता.

पुण्यातील बैठकीनंतर सकारात्मक प्रतिसाद न आल्याने 26 डिसेंबर 2022 मध्ये संजय दुधाणे यांनी नागराज मंजुळे यांना नोटिस पाठवली. कथा लेखकाच्या वादामुळे मी चित्रपट करणार नाही असे मंजुळे यांनी रणजीत जाधव यांना कळवले होते. त्यानंतर 5 जानेवारी 2023 रोजी रणजीत जाधव यांनी त्यांच्या आणि नागराज मुजुंळे यांच्या वकिलांसोबत दुधाणे यांची पुणे येथे भेट घेऊन सहकार्य करण्याची विनंती केली होती. दरम्यान जिओ स्टूडियोजने खाशाबा चित्रपटाची घोषणा केल्याने मंजुळे यांच्या पुणे येथील स्टुडिओत 8 जुलै 2023 रोजी रणजीत जाधव यांच्या वकिलासह एकत्रित समझोता बैठक घेतली. या बैठकीला शिवछत्रपती क्रीडा पुरस्काराने सन्मानित क्रीडा प्रशिक्षक रणजीत चामले तसेच पत्रकार विठ्ठल देवकाते उपस्थित होते.
संजय दुधाणे यांचे लेखक, संशोधक तसेच आभार प्रदर्शनात नाव देण्यात येईल आणि रणजीत जाधवांइतकेच समान मानधन देण्याचे यात ठरले होते.

नागराज मंजुळे यांच्या आटपाट प्रोडक्शनच्या स्टुडिओत झालेल्या बैठकीतील कराराबाबत नागराज मंजुळे आणि रणजीत जाधव यांनी उदासीनता दाखविल्याने दुधाणे यांनी नागराज मुंजुळे आणि जिओ स्टेडिओला कायदेशीर नोटिस पाठवली. यानंतर एका बड्या मध्यस्थीदारा मार्फत नागराज मंजुळे यांचे वकील अ‍ॅड. रामकृष्ण कुलकर्णी यांनी सप्टेंबर 2024 मध्ये 2 वेळा प्रत्यक्ष भेटून समझोता करार लिहून आणला होता. 3 लाख रूपये देऊन पुस्तकाचे सर्व हक्क आणि चित्रपटाला ना हरकत देत आहोत असे करारात लिहले होते. लेखक संजय दुधाणे यांच्या पुस्तकाचे सर्व हक्क रणजीत जाधव यांना द्यावे असा करारात अट होती. ही अट मान्य नसल्याने अखेर संजय दुधाणे यांनी पुणे सत्र न्यायालयात धाव घेतली.

चित्रपट अभिनेता रितेश देशमुख यांच्या मुंबई फिल्म कंपनीद्वारे भारताचे पहिले ऑलिंपिक पदक विजेते कुस्तीगीर खाशाबा जाधव यांच्यावर पॉकेट डानॉमो या चित्रपटाची निर्मिती केली जाणार होती. हा चित्रपटाची कथा संजय दुधाणे लिखित ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव यांच्या पुस्तकावर आधारित होती. चित्रपटाची पटकथा वाई येथील तेजपाल वाघ यांनी लिहिली होतीे. तसा करार मुंबई फिल्म कंपनीद्वारे चित्रपट समन्वक सुनील अभ्यंकर यांनी केला होता. या करारात साक्षीदार म्हणून रणजीत जाधव यांनी सही केली होती. याबाबत स्वतः रणजीत जाधव यांनी 30 ऑगस्ट 2013 रोजी कराड येथे पत्रकार परिषद घेऊन तसे जाहिर केले होते.

संजय दुधाणे लिखित ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव हे खाशाबांवरील पहिलेच आणि एकमेव पुस्तक आहे. यासाठी खाशाबांच्या काळातील कुस्तीगीरांची भेट घेऊन परिपूर्ण माहिती एकत्रित केली होती. दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या हस्ते 2001 मध्ये या पुस्तकाचे प्रकाशन झाले होते. ऑलिंपिकवीर खाशाबा जाधव या पुस्तकाची विक्रमी 15 वी आवृत्ती प्रकाशित झाली असून, या पुस्तकाला 2008 मध्ये सर्वोत्कृष्ठ क्रीडा पुस्तकाचा राज्य पुरस्कारही मिळाला आहे. 2004 मध्ये इयत्ता 9 वी आणि 2015 मध्ये इयत्ता 6 वीच्या पाठ्यपुस्तकात या पुस्तकातील पाठ समाविष्ट करण्यात आला आहे. याच पुस्तकाच्या आधारे तेजपाल वाघ यांनी चित्रपटाची पटकथा लिहिली होतीे. त्यांनी पटकथा आणि संशोधन असे सर्व नागराज मंजुळे यांच्याकडे सुपूर्त केले होते. असे असताना संजय दुधाणे यांना अंधारात ठेवून मंजुळे चित्रपट निर्मिती करीत असल्याने हा वाद न्यायालयाच्या दारात पोहचला आहे.

आधिक माहितीसाठी संपर्क
प्रा. संजय दुधाणे, 8888826021
अ‍ॅड. सुवर्णा शिंदे, 8275275466

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *