‘ सुजाता मडके ‘ या शहापूरच्या कन्येची “इस्रो”मध्ये थरारक झेप
ठाणे दि २६ : “यशाला शॉर्टकट नसतो, पण जिद्द, मेहनत आणि स्वप्नांवर विश्वास असेल तर अवकाशातही भरारी घेता येते” या शब्दात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेमध्ये शास्त्रज्ञ म्हणून निवड झालेल्या मोटार परिवहन विभागात वाहन निरीक्षक म्हणून कार्यरत असलेल्या शहापूर तालुक्यातील शिरगाव (जि. ठाणे) येथील सुजाता रामचंद्र मडके हिचे अभिनंदन केले आहे.
सध्या ठाणे शहरातील मोटार परिवहन विभागात वाहन निरीक्षक म्हणून कार्यरत असलेल्या सुजाता मडके यांची प्रतिष्ठित भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) मध्ये शास्त्रज्ञ म्हणून निवड झाली आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशाने केवळ ठाणे जिल्हाच नव्हे, तर संपूर्ण परिवहन विभागाचा गौरव वाढवला आहे. असे प्रतिपादन मंत्री सरनाईक यांनी केले आहे.

मंत्री सरनाईक म्हणाले की, साध्या शेतकरी कुटुंबातून आलेल्या सुजाता यांनी आपल्या शिक्षणात सातत्य राखत, आयुष्यभर कष्ट आणि चिकाटीचा आदर्श घालून दिला. त्यांच्या यशामागे आई-वडिलांचे संस्कार, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि स्वतःची अविरत मेहनत यांचा सुंदर संगम दिसून येतो.
ते पुढे म्हणाले,अनेकांसाठी प्रेरणादायी ठरलेली ही झेप ग्रामीण भागातील तरुणाईसाठीही आशेचा किरण आहे. “स्वप्न मोठं असावं, मेहनत प्रामाणिक असावी आणि आत्मविश्वास दृढ असावा, यश नक्कीच मिळतं,” हे सुजाता मडके यांच्या यशकथेतून स्पष्ट जाणवतं.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या माध्यमातून संपूर्ण परिवहन विभागाने सुजाता मडके यांचे मनःपूर्वक अभिनंदन करत पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.ML/ML/MS