ऑनलाइन गेमिंगच्या व्यसनामुळे 3 सख्ख्या बहिणींची आत्महत्या
गाझियाबाद, दि. ४ : देशभरात मुलांना लागलेले ऑनलाईन गेम्सचे व्यसन हा आता एक गंभीर प्रश्न झाला आहे. आज उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथे तीन सख्ख्या बहिणींनी ऑनलाईन गेम खेळण्यापासून पालकांनी रोखल्यामुळे आत्महत्या केली आहे.
निशिका (१६), प्राची (१४) आणि पाखी (१२) अशी मृत बहिणींची नावे असून त्यांनी सामूहिकरित्या टोकाचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे. प्राथमिक तपासानुसार, ही घटना ऑनलाइन गेमिंग अॅपच्या व्यसनाशी संबंधित असल्याचे समोर आले असून, पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
या तिन्ही बहिणींना ऑनलाइन कोरियन गेम खेळण्याची सवय होती. मंगळवारी (दि.३) या गेमचा शेवटचा टप्पा होता. या बहिणींनी शेवटचे टास्क पूर्ण करून ९ व्या मजल्यावरून उडी मारली, अशी माहिती समोर येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी मध्यरात्री सुमारे २.१५ वाजण्याच्या सुमारास लोनी परिसरातील टीला मोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भारत सिटी सोसायटीमधील नऊ मजली इमारतीत ही घटना घडली. तिन्ही बहिणी रात्री आपल्या खोलीतून बाहेर पडल्या, घरातील देवघराच्या खिडकीजवळ गेल्या आणि खिडकी उघडली. खिडकीजवळ ठेवलेल्या खुर्चीच्या सहाय्याने त्यांनी एकामागोमाग एक खाली उडी मारल्याचा पोलिसांचा अंदाज आहे.
पोलिस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, कोरोना महामारीनंतर या तिन्ही बहिणी शाळेत जात नव्हत्या. या घटनेनंतर पालकांना घरात एक चिठ्ठी आढळली. काचेवर चिकटवलेल्या या चिठ्ठीत True Life Story असं लिहिलं असून त्यावर एक सॅड इमोजी काढलेला होता. हिंदी-इंग्रजी अशा मिश्र भाषेत लिहिलेल्या चिठ्ठीत, “या डायरीमध्ये जे काही लिहिलं आहे, ते सर्व वाचा कारण हे सर्व खरं आहे. आताच वाचा! मला खरंच माफ करा. सॉरी पप्पा!”
असा मजकूर लिहिला आहे.
SL/ML/SL