ऊस तोडणी दर ३४ टक्क्यांनी वाढले तर कमिशनमध्येही वाढ
पुणे, दि.५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पुणे येथील साखर संकुलात शरद पवार यांच्या उपस्थितीत साखर संघाचे पदाधिकारी आणि ऊस तोडणी वाहतूक कामगार संघटनांचे पदाधिकारी यांची बैठक काल झाली, सहाव्या बैठकीच्या या चर्चेत ऊसतोडणी वाहतूक दरात ३४% आणि कमिशन दरात १% वाढ करण्याचा उभयमान्य तोडगा काढण्यात आला, सर्वांनी हा तोडगा मान्य केला आहे.
बैठकीत अॅडव्हान्स बाबतच्या फसवणूक बंद करण्यासाठी एक कायदा करून ऊस वाहतूकदार तसेच मुकादमाना संरक्षण देण्याची तरतूद करण्यात येईल, कल्याणकारी महामंडळात नोंदणी करुन ओळखपत्र देणे, सुविधा सुरू करणे हे गतिमान करण्यासाठी बैठका घेण्याचेही ठरविण्यात आले. या दरवाढीचा लाभ राज्यात नऊ लाख ऊसतोड कामगारांना तसेच राज्याबाहेर कर्नाटक, गुजरात ,तामिळनाडू इत्यादी राज्यात ऊस तोडणीसाठी जाणाऱ्या ऊसतोड कामगारांनाही लाभ मिळणार आहे. हा करार तीन हंगामासाठी झाला आहे.
बैठकीस साखर संघाचे अध्यक्ष पी.आर पाटील,नॅशनल फेडरेशन चे जयप्रकाश दांडेगावकर, आ. जयंत पाटील, हर्षवर्धन पाटील,आ. प्रकाश आवाडे, पंकजा मुंडे आदी नेते उपस्थित होते. तर ऊसतोडणी वाहतूक कामगार संघटनेचे डॉ.डी.एल.कराड, आमदार सुरेश धस, प्रा. डाॅ.सुभाष जाधव आदी उपस्थित होते.
ML/KA/SL
5 Jan. 2024