स्वीप कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थी करणार मतदानाबाबत जनजागृती

नाशिक, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :भारत निवडणूक आयोगाकडून मतदार नोंदणी आणि मतदानाबाबत जनजागृतीसाठी स्वीप कार्यक्रम राबविणेत येत आहे. याचाच एक भाग म्हणून जिल्हा प्रशासनामार्फत आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीमध्ये मतदानासाठी जनजागृती करण्याकरीता जिल्ह्यातील लाखो शालेय विद्यार्थ्यांची मदत घेण्यात येणार आहे. विद्यार्थी आता पालकांकडून मतदानासाठी संकल्प पत्र भरून घेणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जलज शर्मा यांनी दिली आहे.
जिल्हा प्रशासनाकडून शिक्षणाधिकारी (माध्यमिक) आणि त्यांचे अधिनस्त गट शिक्षणाधिकारी यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील शाळांमध्ये संकल्प पत्र पाठविणेत येत आहेत. हे संकल्प पत्र मुख्याध्यापक आणि शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांना देतील आणि पालकांकडून मतदानासाठी संकल्प पत्र भरून घेण्याचे आवाहन करणार आहेत. संकल्प पत्राद्वारे विद्यार्थी आपल्या पालकांना मतदान करतांना स्वेच्छेने, कोणत्याही भितीपोटी, लालसेपोटी मतदान न करता धर्मनिरपेक्ष भावनेने मतदान करण्याची जबाबदारी पार पाडावी, असे आवाहन करणार आहेत. भारतीय घटनेने दिलेल्या मतदानाच्या अधिकाराचा वापर करून घेण्यासाठी विद्यार्थी आपल्या पालकांकडून संकल्प घेऊन संकल्प पत्रे भरून घेतील. विद्यार्थ्यांकडून भरून घेतलेली संकल्प पत्रे शाळांमध्ये संकलित करण्यात येतील.
आजचे शालेय विद्यार्थी देशाचे भावी मतदार असल्याने त्यांना लोकशाही, निवडणूका, मतदार नोंदणी आणि मतदान या विविध बाबींसंदर्भात महत्वाची माहिती जाणून घेत पालकांना मतदानासाठी प्रेरीत करता येईल. आपल्या पाल्याच्या आग्रहास्तव पालक नक्कीच मतदानासाठी पुढे येतील. जिल्ह्यातील नागरिकांनी आपल्या पाल्याच्या आणि जिल्हा प्रशासनाच्या आवाहनास प्रतिसाद द्यावा , जास्तीत जास्त संकल्प पत्रे भरून मतदान करून हे अभियान यशस्वी करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जलज शर्मा यांनी केले आहे. Students will create awareness about voting through sweep program
PGB/ML/PGB
17 March 2024