शिक्षक गैरहजर म्हणून विद्यार्थ्यांनी केले आंदोलन
चंद्रपूर, दि. १० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यापासून सात किमी अंतरावर असलेल्या पाटागुडा येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक येतच नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. ‘आम्हाला शिक्षक द्या हो’ म्हणत शाळेतील विद्यार्थ्यांनी एकत्र येत चक्क रस्त्यावर उतरून रस्ता जाम केल्याची घटना समोर आली आहे.
शाळेत शिक्षक नसल्याने विद्यार्थी शिक्षकासाठी शेवटी पंचायत समितीच्या दिशेने गावापासून एक ते दीड किलोमीटर अंतर पायी प्रवास करीत निघाले. हे प्रकरण पाहत गावचे पोलीस पाटील यांनी टेकामांडवा येथील पोलिस प्रशासनाला माहिती दिली. पोलिस ताफ्यासह शाळेत पोहोचले. त्यांनी विद्यार्थ्याच्या समस्या जाणून घेतल्या.
तालुक्यात ५८ शिक्षकांची रिक्त पदे आहेत. चार दिवसांत शिक्षक देऊन समस्या सोडवू, असे आश्वासन केंद्रप्रमुख बावणे यांनी दिले. विशेष म्हणजे, ही मुले उपाशीपोटी आंदोलनात सहभागी झाली.
ML/KA/SL
10 Feb. 2023