Reels बनवण्याच्या नादात खरोखरच लागला फास

जामखेड शहरात एक धक्कादायक घटना घडली असून, “फाशी”ची रील बनवण्याच्या प्रयत्नात एक युवक प्रत्यक्षात फाशीत अडकून गेला. दरम्यान यावेळी रील काढणाऱ्याने सामाजिक कार्यकर्ते कोठारी यांना वेळीच संपर्क केल्याने त्याचा जीव सुदैवाने वाचला असला, तरी त्याची प्रकृती गंभीर आहे. प्रकाश भीम बुडा (वय 17) असे या युवकाचे नाव असून तो नेपाळचा रहिवासी आहे. तो सध्या जामखेड येथील एका हॉटेलमध्ये काम करत आहे. सोशल मीडियावर रील व्हायरल करण्याच्या उद्देशाने त्याने फाशी घेण्याचा बनाव करत स्वतःचे चित्रीकरण सुरू केले होते. मात्र, दोरी गळ्याला अडकली आणि तो शुद्ध हरपून फासावर लटकला.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली व स्थानिक नागरिकांच्या मदतीने प्रकाशला खाली उतरवले. त्यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्याची प्रकृती चिंताजनक असून उपचार सुरू आहेत.